पिंपळे निलख रक्षक चौकातील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामाला गती देण्याचे प्रशासनाला निर्देश
पवना नदी सुधार योजना आराखड्याला गती द्या- शंकर जगताप
प्रधानमंत्री आवास योजनांचा घेतला आढावा
पिंपरी चिंचवड शहरात उद्योग महर्षी रतन टाटा यांचे स्मारक उभारणार
दि. २० (पीसीबी)- पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहतुक कोंडीच्या समस्येने नागरिक हैराण आहेत. वारंवार अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी संदर्भात नागरिकांच्या तक्रारी येतात. प्रलंबित भुयारी मार्ग, उड्डाणपूल तसेच रस्त्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे. नागरिकांकडून सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी शहरात पीएमपीएल बसची वारंवारता वाढवण्यात यावी. मुख्य म्हणजे इलेक्ट्रिक आणि मिडी बसेससाठी प्राधान्य देण्यात यावे असे निर्देश आमदार तथा पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी महापालिका प्रशासनाला बुधवारी दिले.
दरम्यान पिंपळे निलख रक्षक चौकातील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना देखील आमदार शंकर जगताप यांनी केल्या आहेत. संरक्षण विभागाच्या हद्दीतील मुख्य उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे महत्त्वाचे काम पूर्णत्वाला जात आहे. या दृष्टीने प्रशासनाने योग्य नियोजन करून वेळेत हे काम पूर्ण करावे अशी सूचना आमदार जगताप यांनी केली आहे. पवना नदी सुधारणा प्रकल्पाला वेग द्यावा, पिंपरी चिंचवड शहरात प्रधानमंत्री आवास योजनांचा आढावा त्यांनी घेतला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आमदार शंकर जगताप यांनी आढावा बैठक घेतली . बैठकीला आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर तसेच मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, पाणीपुरवठा विभाग मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी आदि उपस्थित होते. पिंपरी चिंचवडमधील विविध प्रश्नांसंदर्भात जगताप यांनी आढावा घेतला.
रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन वाहतूक सुकर करण्यात यावी. वाहतूक कोंडी संदर्भात प्राधान्याने उपाययोजना करण्यात याव्या. मिसिंगलींकच्या रस्त्यांकरिता भूसंपादन करावे, पादचारी पुलांची उभारणी, बेकायदेशीर अतिक्रमण काढणे, अनधिकृत झोपडपट्ट्यांवर कारवाई करणे, ग्रेड सेपरेटर अंडरपास तसेच उड्डाण पुलाच्या निधीच्या तरतुदीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली
रक्षक चौकातील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामाला गती द्या
पिंपळे निलख परिसरातील रक्षक चौक ते पिंपळे निलख गावादरम्यान मुख्य रस्ता, उड्डाणपूल व भुयारी मार्गाच्या कामाचा आढावा आमदार शंकर जगताप यांनी घेतला.
हे काम सुरू असल्यामुळे नागरिकांना पर्याय मार्गांचा वापर करावा लागतो. हे पर्यायी रस्ते दुरुस्त करण्यात यावे पावसाळ्यानंतर रस्त्याची सद्यस्थिती जाणून घ्यावी. मागील अनेक वर्षांपासून रक्षक चौक येथे उड्डाणपुलाची गरज व्यक्त केली जात होती. त्यामुळे संरक्षण विभागाच्या हद्दीतील मुख्य उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे महत्त्वाचे काम पूर्णत्वाला जात आहे. या दृष्टीने प्रशासनाने योग्य नियोजन करून वेळेत हे काम पूर्ण करावे अशी सूचना आमदार जगताप यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात उद्योग महर्षी रतन टाटा यांचे स्मारक उभारणार
आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये उद्योग महर्षी रतन टाटा यांचे चिंचवड मतदार संघात सुनियोजित स्मारक उभारण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. औद्योगिक स्मारक म्हणून हे स्मारक संपूर्ण शहराचा लौकिक ठरेल असे देखील आमदार शंकर जगताप यांनी म्हटले आहे . पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. संपूर्ण जगामध्ये या शहराचा लौकिक औद्योगिक शहर म्हणून परीचीत आहे. या शहरासाठी टाटा उद्योग समूहाने मोठे योगदान दिले आहे. ऑटोमोबाईल हब आणि आयटी सिटी म्हणून शहराचा लौकिक सर्वदूर होत असतानाच या शहरांमध्ये उद्योग महर्षी रतन टाटा यांचे स्मारक उभारणे रतन टाटा यांचा यथोचित सन्मान ठरेल असे आमदार जगताप यांनी म्हटले आहे.
स्वतंत्र गोशाळेची उभारणी करा
पिंपरी चिंचवड शहरामध्ये भटक्या जनावरांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. भटकी जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसलेली असतात. यामुळे वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. रात्रीच्या वेळी या जनावरांना वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे शहरांमध्ये स्वतंत्र गोशाळा अत्यंत गरजेची आहे. या संदर्भात प्रशासनाने प्रस्ताव तयार करावा. निधीची तरतूद करावी आणि शहरांमध्ये स्वतंत्र गोशाळेची उभारणी करावी अशी सूचना आमदार शंकर जगताप यांनी केली आहे.
प्रशासनातील अडचणी सोडवा
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासना अंतर्गत काम करणाऱ्या सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यात यावी .सुरक्षा विभागातील पदोन्नतीतील अडचणी दूर करण्यात याव्या. याशिवाय महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना बोनस व सानुग्रह अनुदान रकमे करिता पुढील पाच वर्षांचा करारनामा करण्यात यावा. पुणे महानगर परिवहन महामंडळात अर्थात पीएमपीएल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा फरक देण्यासाठी द्वितीय हप्ता तातडीने अदा करण्यात यावा अशी देखील सूचना आमदार जगताप यांनी केली आहे.
आमदार शंकर जगताप यांच्याकडून प्रशासनाला सूचना
किवळे, मामुर्डी, रावेत, पुनावळे परिसरातील मनपाच्या ताब्यातील जागेत राष्ट्रीय दर्जाचे उद्यान किंवा क्रीडांगण विकसित करणे.
पिंपळे गुरव येथील क्रीडा संकुलाकरिता निधीची तरतूद आणि येथील आरक्षणात बदल करणे.
काळेवाडी येथील एमके चौक बीआरटी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ग्रेड सेपरेटर मंजूर करणे.
पिंपळे सौदागर स्वराज्य चौक येथे अंडरपास व पिके चौक येथे उड्डाणपुलाकरिता निधीची तरतूद करणे.
पिंपळे गुरव येथील कल्पतरू चौकात अंडरपाससाठी निधीची तरतूद करणे.
सांगवी फाटा येथे नागरिकांच्या सोयीसाठी पादचारी पुल उभारणे.
काळेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टीची उभारणी .
चिंचवड मतदार संघातील मिसिंग लिंक रस्त्यांकरिता भूसंपादन करावे.
मुंबई बेंगलोर द्रुतगती महामार्गालगत मनपा हद्दीतील 12 मीटर रस्ता विकसित करणे.
वाल्हेकर वाडी स्मशानभूमीचे काम करणे.
सह्याद्री कॉलनी पिंपळे गुरव येथे महापालिकेच्या ताब्यातील आरक्षित जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण काढणे.
सांगलीतील पीडब्ल्यूडी ग्राउंडवरील अनधिकृत झोपडपट्ट्यांवर कारवाई करणे.
चिंचवड लिंक परिसरात नदीत कचरा टाकून अतिक्रमणे केली आहेत यावर तातडीने कारवाई करणे.
चिंचवड मतदारसंघात आंतरराष्ट्रीय दर्जाचे महिला कुस्ती केंद्र उभारणे.
बचत गटातील महिलांमार्फत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यात आले . त्यांचा प्रोत्साहन भत्ता अदा करणे.
थेरगाव येथील पोस्ट ऑफिससाठी जागा उपलब्ध करून देणे.
चिंचवड मतदार संघातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करणे.
रहाटणी परिसरातील नाल्यांची कामे पूर्ण करणे.
वाकड बीआरटी लेनचे काम पूर्ण करणे.
पुनावळे येथील मनपाच्या शाळेच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देणे.
रावेत येथे नवीन पोलीस स्टेशन बांधण्यासाठी महापालिकेच्या ताब्यातील जागा देणे.
रिलायन्स जिओ कंपनीच्या फायर ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करणे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णकृती शिल्प पुतळा वाकड येथील मनपा शाळेच्या इमारतीच्या जागेत बसवणे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील सेवा रस्त्यांच्या कार्यक्षेत्रातील बंद नाले, गटार यांच्या दुरुस्तीबाबतच्या सूचना आमदार शंकर जगताप यांनी केल्या आहेत.











































