लखनौ, दि. १० (पीसीबी) : अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी आज (शुक्रवार) यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये मोठी घोषणा केली.प्रत्येक गावात 5G सेवा (5G Services) पोहोचवण्यासाठी आणि दूरसंचार नेटवर्कचा विस्तार वाढवण्यासाठी अंबानींनी पुढील चार वर्षांत 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. या गुंतवणुकीतून सुमारे 1 लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
लखनौ इथं आयोजित यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये बोलताना मुकेश अंबानींनी दावा केला की, 5 वर्षात उत्तर प्रदेश 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. तर, जिओ डिसेंबर 2023 पर्यंत राज्यभरात 5G सेवा सुरू करेल. याशिवाय, दूरसंचार समूह 10 GW नूतनीकरणक्षम क्षमतेची स्थापना करेल आणि राज्यात जैव-ऊर्जा व्यवसाय सुरू करेल, असंही ते म्हणाले.
रिलायन्सनं राज्यातील गावं आणि लहान शहरांमध्ये परवडणारं शिक्षण आणि आरोग्यसेवेसाठी जिओ प्लॅटफॉर्मद्वारे जिओ-स्कूल आणि जिओ-एआय-डॉक्टर या दोन प्रकल्पांची घोषणा केली. यासोबतच अंबानींनी उत्तर प्रदेशातील कृषी आणि बिगर कृषी उत्पादन अनेक पटीनं वाढवण्याचा मानस व्यक्त केला. याचा फायदा शेतकरी, स्थानिक कारागीर, लघु आणि मध्यम उद्योगांना होणार आहे. मुकेश अंबानींनी 2023 च्या अखेरीस यूपीच्या सर्व शहरांमध्ये 5G सेवा सुरु होईल, असंही सांगितलं.