“प्रत्येक क्षण आनंदात घालवल्यास सुखप्राप्ती!”

0
191

पिंपरी, दि.९(पीसीबी) “जीवनात वाट्याला आलेला प्रत्येक क्षण आनंदात घालवल्यास सुखप्राप्ती होते!” असे विचार ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी विरंगुळा केंद्र, पागेची तालीम, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक ०८ ऑक्टोबर २०२२ रोजी व्यक्त केले. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून किसनमहाराज चौधरी बोलत होते. माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी, कार्यवाह राजाराम गावडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. “ज्येष्ठ नागरिक म्हणजे अनुभवाचे विद्यापीठ होय!” असे मत भाऊसाहेब भोईर यांनी मांडले.

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून, “आपापसात सुसंवाद साधला जाऊन संपर्क वृद्धिंगत व्हावा अन् त्यातून आनंदाची देवाणघेवाण व्हावी हाच कार्यक्रमाचा उद्देश आहे!” अशी भूमिका मांडली. याप्रसंगी ज्या सभासदांनी वयाची पंचाहत्तरी आणि ऐंशी वर्षे पूर्ण केली आहेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. बहुतांश सदस्यांनी आपल्या जीवनसाथीदारासोबत हा सन्मान स्वीकारला; तसेच प्रातिनिधिक मनोगतांच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली. ह.भ.प. किसनमहाराज चौधरी पुढे म्हणाले की, “भगवद्गीतेतून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना कामना कमी करायला सांगितल्या आहेत. विनोबांनी त्याचा मराठी अनुवाद करताना कामना व्यापक, एकाग्र, सूक्ष्म आणि उदात्त केल्यास आपोआप कमी होतात, असा उपदेश केला आहे. सर्वसामान्य माणसाला जीवनात सुख हवे असते; पण संतांंसारखे निरपेक्ष वृत्तीने जगल्यास सौख्य मिळेल!” दीपप्रज्वलन, त्रिवार ओंकार आणि शांतिमंत्राचे पठण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. उषा गर्भे, चंद्रकांत पारखी, सुदाम गुरव, सतीश कुलकर्णी, सुधाकर कुलकर्णी, हरी क्षीरसागर, भिवाजी गावडे, रत्नप्रभा खोत, मंगला दळवी, सुनील चव्हाण यांनी संयोजनात सहकार्य केले. गोपाळ भसे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद जोशी यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.