“प्रत्येक आमदाराला 5 कोटींची ऑफर आणि..”; विधान परिषदेच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांचा दावा

0
109

महाराष्ट्र, दि. १३ जुलै (पीसीबी) – विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी काल 12 जुलै रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवारी निवडून आले आहेत. भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 2 तर शिवसेनेचे 2 उमेदवार असे महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. मविआचे 8 मतं फुटल्याने याचा फायदा हा महायुतीला झाला आहे. या धक्कादायक निकालानंतर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

या दाव्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. त्यांनी प्रत्येक आमदाराला पाच कोटी आणि 100 कोटींची विकासकामे अशी ऑफर देण्यात आली होती, असा दावा केला आहे. तसंच जे आमदार फुटले त्यांची नावे समोर येतीलच, असंही आव्हाड म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांचा धक्कादायक दावा
विधान परिषदेच्या निवडणुकीत जी काही मते फुटली किंवा फोडण्यात आली, त्याचे एकमेव कारण म्हणजे पैसा आणि विकासनिधी. म्हणजे जनतेच्याच पैशाचा खेळ! विकासनिधी हा कुणी स्वतःच्या घरातून आणत नाही. जनतेच्या करातून सरकारी तिजोरीत जमा झालेला पैसा हा विकासनिधी म्हणून वापरला जातो. पण, या सरकारने तेही जमविले नाही. अशी टीका आव्हाड यांनी केली.

या सरकारने फक्त कर्जाचा डोंगर उभा केला अन् त्या कर्जाच्या डोंगरातूनच हे पैसे काढले जात आहेत. म्हणजेच, जनतेच्याच खिशाला कात्री लावण्याचे काम केले जातेय. पाच कोटी रूपये आणि शंभर कोटी रूपयांची कामे, अशी ऑफर प्रत्येक आमदाराला दिली जात होती. काही पैशांच्या अमीषाला बळी पडले. स्वतःच्या राजकीय अस्तित्वाविषयी काळजी नाही; स्वतःच्या राजकारणाविषयी पुढे जाण्याची इच्छा नसेल तर त्याला कोण काय करणार?, असा टोला लगावत आव्हाड यांनी हा धक्कादायक दावा केला आहे.

पुढे त्यांनी लिहिलं की, “अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. यानंतर पुढे विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. पण, जे आमदार फुटले आहेत; त्यांची नावे आज रात्री किंवा उद्या बाहेर पडणारच आहेत. त्यामुळे आपला आमदार पैसे घेऊन फुटला आणि पक्षाशी गद्दारी केली, हे पुन्हा एकदा जाहीर होईल.”, असा इशाराही आव्हाड यांनी दिलाय.

या गद्दारीविरोधात प्रचंड संताप जनतेच्या मनात आहे. गद्दारी करणाऱ्यांविरुद्ध तसेच गद्दारी करायला लावणार्‍यांविरोधातही जनतेच्या मनात रोष आहे. पाच कोटी रूपये आणि 100 कोटींची विकासकामे हा दर ठरला होता. तुम्ही हे देऊन आमदारांना विकत घेऊ शकता; पण, जनतेला घेऊ शकत नाहीत, अशी टीका आव्हाड यांनी ट्वीट करत केली आहे.

“..म्हणून तुम्ही 17 वरच अडकले”
तसंच पुढे ते म्हणाले की, “तुम्ही आमदारांना विकत घेताना खूप पैसे वाटले आहेत. आमदारांना विकत घेताना खूप , अगदी हजार कोटी रूपयांचा विकासनिधी दिलात. पण, तुम्हाला कुठेच यश मिळू शकला नाही. म्हणून तुम्ही 17 वरच अडकले. तेव्हा जनतेला विकत घेऊ शकतो, या भ्रमात राहून आम्ही विधानपरिषद जिंकली आता विधानसभा जिंकू , हे विसरून जा. जनतेच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड राग आहे. आजनंतर अधिक राग निर्माण होईल की अजून तुमच्या घाणेरड्या सवयी गेलेल्या नाहीत.”, असा संताप जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.