दि.५(पीसीबी) – विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फार चतूर आहेत, फार चाणाक्ष आहेत. त्यांनी दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केलंय. जो जीआर काढलाय त्याचा अर्थ काहीच लागत नाही. ओबीसींना काय दिलं हेच समजत नाही. एकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्याने रडल्यासारखे करायचं. एकाने हसल्यासारखं करायचं आणि दुसऱ्याने अश्रू पुसल्यासारखं करायचं. अशा पद्धतीचं स्क्रिप्टेड काम सध्या राज्यात सुरू आहे. भविष्यात सगळ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसून येईल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने जारी केलेल्या मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी नेते एकटवटले असून छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, हा सरसकट जीआर नसून केवळ पुराव्याचा आदेश आहे असे मु्ख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयावर शंका उपस्थित केल्या जात आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांनी दोन्ही समाजाला झुलवत ठेवलं असून सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
राज्य शासनाने काढलेल्या जीआरचा अर्थच कळत नाही. महायुतीचे सरकार हे बाबळीच्या झाडाला दगड मारतात आणि आंबे पडले म्हणून ओरडत. त्यांच्याजवळ गेले की मात्र काटे रुततात, जे जे जवळ गेले त्यांना ते कळेल, असे म्हणत महायुती सरकारवर वडेट्टीवार यांनी टीका केलीय. तर, बारामतीत आज ओबीसी समाजाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने वड्डेटीवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मोर्चा काढणं, आंदोलन करणं, घोषणा देणे, उपोषण करणे यामध्ये सरकारच्या बुडाला आग का लागते? राग का येतो? ओबीसीचा आवाज दाबायचा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय
चोरीचं काम आणि चुकीचं काम कोणी केलं असेल तर त्याच्यावर कारवाई करणं पोलीस अधिकाऱ्यांचे काम आहे. सत्ता सेवेसाठी आहे, सत्ता दुसऱ्यांच्यावर दादागिरी करण्यासाठी नाही. त्या अधिकाऱ्यांवर दादागिरी करणे हे लोकशाहीला शोभत नाही. मन वाटेल तसे आम्ही काम करू अशी भूमिका यांची दिसते. प्रत्येकाला सत्तेचा माज आलाय. यांच्यामध्ये तो ओसंडून वाहत असल्याचा दिसून येत, असे म्हणत अजित पवारांच्या व्हायरल व्हिडिओवरही विजय वडेट्टीवार यांनी टीका केलीय. सत्ता सेवेसाठी होती पण आता महायुतीच्या सरकारला सत्ता मालकी हक्काने मिळाल्यासारखे वाटते. करमाळ्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटीवरून विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.