प्रत्येकाने ‘रस्ता सुरक्षा ब्रँड अँबेसिडर’ बनावे – बापू बांगर

0
21

आकुर्डी रोटरी क्लब व चिंचवड रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा कॅलेंडरचे प्रकाशन

पिंपरी,दि. 31 (पीसीबी) – प्रत्येक नागरिकाने स्वतः वाहतूक नियमांचे पालन करून संपूर्ण समाजात रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यासाठी ब्रँड अँबेसिडर बनावे, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी आज केले.

रोटरी क्लब ऑफ आकुर्डी व रोटरी क्लब ऑफ चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक विषयक जनजागृती करणारे कॅलेंडर तयार करण्यात आले आहे. त्याचे प्रकाशन बांगर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल शीतल शहा, आकुर्डी रोटरी क्लबचे अध्यक्ष गौतम शहा, नियोजित अध्यक्ष पराग जोशी, माजी अध्यक्ष राजेश अग्रवाल, जसविंदर सिंग सोखी उपस्थित होते.

रस्ते सुरक्षा विषयक जनजागृतीसाठी आकुर्डी रोटरी क्लबने पुढाकार घेतल्याबद्दल पोलीस उपायुक्त बांगर यांनी सर्व सदस्यांचे कौतुक केले. रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी रस्ता सुरक्षा ब्रँड अँबेसिडर होऊन जनजागृती करावी, असे ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात 2022 मध्ये 372 जणांचा अपघाती मृत्यू झाला. 2023 मध्ये ही संख्या 373 होती. हा आकडा गेली काही वर्षे वाढतच होता, मात्र यावर्षी हा आकडा 345 पर्यंत कमी करण्यात यश मिळाले आहे. 28 लोकांना यावर्षी मृत्यूपासून वाचवण्यात आपल्याला यश आले आहे. त्याचे श्रेय वाहतूक शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांना जाते, अशी माहिती बांगर यांनी दिली.

शहरात अपघातात मरण पावलेल्यांमध्ये 205 दुचाकी स्वार तर सुमारे 100 पादचाऱ्यांचा समावेश आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केल्यास तसेच पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला पाहून तसेच हात वर करून रस्ता ओलांडावा तसेच चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे. त्यामुळे बरेचसे अपघात व अपघाती मृत्यू टाळणे सहज शक्य आहे, असे मत बांगर यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना वाहतूक विषयक नि अशी माहिती व्हावी यासाठी एक पुस्तिका छापण्यात येणार आहे. त्यासाठी रोटरी क्लबने सहकार्य करावे, असे आवाहन बांगर यांनी केले.

प्रांतपाल शीतल शहा म्हणाले की, वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. घरटी दोन गाड्या झाल्या आहेत. प्रत्येकाने शिस्त पाळली तरच हा प्रश्न सुटेल. सर्व रोटरी क्लब क्लबनी हा विषय हाती घ्यायला हवा. आपल्या विचार प्रक्रियेत बदल केला पाहिजे. पिंपरी -चिंचवडमधील 25 क्लबनी रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती करावी.

रोटरी क्लबच्या रस्ता सुरक्षा कॅलेंडरसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल यतीश भट, प्रथमेश पोफळे, विजय तारक, पराग आलेकर, मारुती चिखलीकर, कुलदीप सिंग, जसविंदर सिंग सोखी, राजेश अग्रवाल यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेश अग्रवाल यांनी केले. सुखविंदर सिंग सोखी यांनी आभार मानले.