प्रतिसाद वाढल्याने छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना आणखी वेग द्या- मुख्य अभियंता राजेंद्र पवार

0
207

४१ अभियंत्यांसह एजन्सीजच्या प्रतिनिधींची संयुक्त कार्यशाळा

पुणे, दि. ४ (पीसीबी) : पुणे परिमंडलामध्ये छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीसाठी वीजग्राहकांकडून प्रतिसाद वाढत आहे. आतापर्यंत छतावरील सौर ऊर्जेचे लघु व उच्चदाबाचे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील ११ हजार ७०० पेक्षा अधिक प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या योजनेस आणखी वेग देण्यासोबतच सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करताना विद्युत सुरक्षेकडे अधिक लक्ष द्यावे असे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.

छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीसाठी प्रत्यक्ष काम करणारे सर्व ४१ उपविभाग कार्यालयांतील सहायक अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) आणि सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या एजन्सीजच्या प्रतिनिधींची संयुक्त कार्यशाळा रास्तापेठ येथील सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या बहुउद्देशीय सभागृहात नुकतीच झाली. यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत व श्री. सतीश राजदीप यांच्यासह सर्व विभागाचे कार्यकारी अभियंत्यांची कार्यशाळेत प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी गेल्या तीन-चार महिन्यांपासून अभियंता, कर्मचाऱ्यांना व एजन्सीजच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण तसेच तांत्रिक व प्रशासकीय गतिमानतेतून वेग देण्यात आला आहे. यासह महावितरण आणि एजन्सीजच्या प्रतिनिधींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढे दोहोंच्या समन्वयातून वीजग्राहकांकडील सौर ऊर्जा प्रकल्प विनाविलंब मार्गी लागतील अशी अपेक्षा श्री. पवार यांनी व्यक्त केली.

या कार्यशाळेत महावितरणचे सहायक अभियंता व एजन्सीजच्या प्रतिनिधींनी छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना गती देण्याच्या विविध मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा केली. त्यातून अनेक अडचणींचे मुद्दे व प्रश्न निकाली काढण्यात आले. तसेच तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाहीची माहिती देत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर पुणे परिमंडलासाठी महावितरण व एजन्सीजच्या संबंधित कामांसाठी संयुक्त कृती आराखडा ठरविण्यात आला. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी यांनी काम पाहिले. महावितरणच्या अभियंत्यांसह स्मिता जाधव, समीर गांधी यांच्यासह महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनचे (MASMA), ऑल इंडिया रिन्यूऐबल एनर्जी असोशिएशनच्या (AIREA) तसेच इतर एजन्सीजचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.