प्रताप सरनाईक आणि खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्राबाबत मोठी चर्चा

0
292

 मुंबई, दि. २२(पीसीबी) – राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास ४० आमदार असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागले आहे. मात्र, या दरम्यान आता लोकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्राबाबत चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत आणि प्रताप सरनाईक या दोन्ही नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही फेब्रुवारी महिन्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना एक पत्र लिहीले होते. या पत्रात राऊत यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी मदत करा अन्यथा तुमची अवस्था लालू प्रसाद यादव यांच्यासारखी करू असे म्हटले होते. ही धमकी देण्यासाठी काहीजण भेटले होते असा दावाही राऊत यांनी केला. सरकार पाडण्यासाठी नकार दिल्यास मोठी किंमत मोजावी लागेल असेही राऊत यांनी म्हटले होते. महाराष्ट्र सरकारमधील दोन मोठे मंत्री तुरुंगात जाणार असल्याचीही धमकी देण्यात आली होती, असे राऊत यांनी म्हटले होते. संजय राऊत यांच्या या लेटर बॉम्बची मोठी चर्चा झाली होती. संजय राऊत हे सध्या ईडीच्या रडारवर आहेत.
संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटले?
संजय राऊत यांनी खळबळजनक दावा करताना म्हटले की, राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली. सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणूका पार पाडल्या जातील. मात्र, मी याला नकार दिला. माझ्या या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती, असेही संजय राऊत यांनी पत्रात म्हटले. माझ्यासह महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनादेखील पीएमएलए कायद्यानुसार तुरुंगात डांबण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होऊ शकतात असेही राऊत यांनी म्हटले.