प्रताप सरनाईकांची चौकशी बंद, किरीट सोमय्यांची बोलती बंद

0
320

मुंबई, दि. १७ (पीसीबी) : आमदार प्रताप सरनाईक यांच्या सिक्युरिटी फर्मविरोधात गैरसमजातून तक्रार दाखल केली असल्याची माहिती विशेष पीएमपीएल न्यायालयाला देत टॉप्स ग्रुपचे माजी संचालक रमेश अय्यर यांनी पोलिसांनी तपास दफ्तरबंद करण्यासंदर्भात दाखल केलेल्या सी समरी अहवालावर आक्षेप नसल्याचं स्पष्ट केलं. टॉप्स समूह गैरव्यवहराशी संबंधित तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे विभागाचा अहवाल महागनर दंडाधिकाऱ्यांनी स्वीकारल्याने शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांना ईडी चौकशी प्रकरणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सरनाईक यांची ईडी चौकशी बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे सरनाईकांविरोधात गेली काही महिने आवाज उठविणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. ‘मला यावर काही बोलायचं नाही’, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजेच शिंदे गटात गेल्यावर सरनाईकांच्या पाठीमागचं ईडीचं शुक्लकाष्टही संपण्याची चिन्हं आहेत तसेच सोमय्यांच्या आरोपांच्या फैरीही थांबल्या आहेत.

टॉप्स समूह घोटाळा प्रकरणाच्या आधारेच ईडीने प्रताप सरनाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. परंतु महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तपास बंद करण्याचा अहवाल स्वीकारल्याने सरनाईक यांच्यामागील ईडीचा ससेमिरा थांबण्याची शक्यता आहे. आधी ठाकरे सरकारने ठाण्यातील अनधिकृत बांधकामावरील दंड आणि त्यावरील व्याज माफ केल्यानंतर आता आर्थिक घोटाळ्याशी संबंधित तपास बंद करण्याचा अहवाल न्यायालयाने स्वीकारल्याने सरनाईकांचा दुहेरी फायदा झाला आहे.

सरनाईक यांच्यासंबंधित न्यायालयाने सी समरी अहवाल स्वीकारल्याने मूळ गुन्हा रद्द झाला आहे. त्यामुळे पीएमएलए अंतर्गत ईडीने दाखल केलेला गुन्हा टिकू शकत नाही. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यातून सरनाईक यांची सुटका होणार आहे.