प्रजापिता ब्रम्हकुमारीज सामाजिक बांधिलकीतून देशभर लाखो साधकांपर्यत पोहोचविणार मतदान जनजागृतीचा संदेश..

0
139

प्रजापिता ब्रह्मा कुमारीज ईश्वरीय विश्व विदयालय या संस्थेचे पिंपरी-चिंचवड मध्ये हजारो तर देशभरात लाखो साधक आहेत, आज विद्यालयाच्या निगडी प्राधिकरण शाखेमध्ये सर्व साधकांनी मतदानाच्या दिवशी मतदान करून लोकशाहीत उत्सवात सहभागी होण्याची शपथ घेतली.आजचा हाच मतदान जनजागृतीचा संदेश सोशल मिडीयाद्वारे संपूर्ण देशातील लाखो साधकांपर्यत दिला जाणार असल्याची माहिती निगडी प्राधिकरण शाखेच्या संचालिका ब्रह्मा कुमारी संगीता दिदी यांनी दिली.

  पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दीपक सिंगला यांच्या नियंत्रणाखाली २०६ पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत कार्यक्षेत्रात जनजागृती करण्यात येत आहे.

  आज निगडी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या कार्यालयामध्ये मतदान जनजागृती करण्यात आली, त्यावेळी ब्रह्मकुमारी संगिता दिदी साधकांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

  या कार्यक्रमात महानगरपालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी १३ मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभेच्या निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर असणा-या सुविधांची माहिती दिली आणि सर्वांना मतदानाची शपथ देऊन १०० टक्के मतदान करण्याचे आवाहनही केले.

  यावेळी संस्थेच्या स्वाती बहन, नेत्रा बहन, मुकुल भाई, विजय भाई, प्रफुल भाई, नवनाथ भाई, संतोष भाई तसेच शेकडो साधक उपस्थित होते.

 पीस ऑफ माईंड या संस्थेच्या १५ लाख ८० हजार सदस्य असलेल्या चॅनेलवर देखील आजच्या मतदान जनजागृती कार्यक्रमाचे प्रसारण करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले जाईल असे ब्रह्मा कुमारी संगिता दिदी यांनी सांगितले.