मुंबई, दि. २8 (पीसीबी)
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आणि परभणीतील हिंसाचारानंतर न्यायालयीन कोठडीत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले.
प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दोघांमध्ये मागील तासाभरापासून चर्चा सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत आहे. बीड आणि परभणीच्या विषयावर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर प्रकार आंबेडकर नेमकं काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये मूक मोर्चा निघाला आहे. बीडमधील मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मस्साजोग गावचे सर्व नागरिक मोर्चात सहभागी झाले आहेत. तसेच बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजी राजे भोसले आणि मनोज जरांगेंसह अनेक नेते या मोर्चात सहभागी झाले आहेत. डॉ. आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली असून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी
सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, याप्रकरणामध्ये ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम व विधीतज्ज्ञ सतीश माणशिंदे यांची नियुक्ती व्हावी, हे प्रकरण बीड या ठिकाणी न चालवता मुंबई न्यायालायकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे.