प्रकाश आंबेडकरांनी राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण नाकारले, कारण…

0
180

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले आहे. पण, आंबेडकरांनी हे निमंत्रण नाकारत राम मंदिर सोहळ्याला जाणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. आंबेडकर यांनी निमंत्रण नाकारण्याचं कारण देखील स्पष्टपणे नमूद केलं आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या इशाऱ्याचा उल्लेख केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नाकारताना म्हटलं की, हा सोहळा भाजप आणि आरएसएसकडून आयोजित करण्यात आला आहे. निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी राजकीय मोहीम म्हणून धार्मिक कार्यक्रम आखला गेला आहे. आंबेडकर यांनी फेसबुक पोस्ट करत यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणालेत की, माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता, की जर राजकीय पक्षांनी पंथ देशाच्या वरती ठेवला तर दुसऱ्यांदा आपले स्वातंत्र्य धोक्यात येईल आणि ते कदाचित कायमचे हिरावून जाईल. माझ्या आजोबांची भीती आज खरी ठरली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंथ देशापेक्षा वरती ठेवला आहे. त्यांच्या राजकीय फायद्यासाठी हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

इंडिया आघाडीच्या अनेक प्रमुख नेत्यांनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी यांनी उद्घाटनाला जाणार नसल्याचे याआधीच जाहीर केले आहे. भाजपचा हा राजकीय कार्यक्रम असल्यामुळे आपण जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजद प्रमुख लालू प्रसाद यादव, राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी देखील उद्घाटनाला जाणार नसल्याचे कळवले आहे.

२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. माहितीनुसार, उद्घाटन कार्यक्रमासाठी ८ हजारांपेक्षा अधिक मान्यवरांना अयोध्येत बोलावण्यात आले आहे. भव्य असा कार्यक्रम व्हावा यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.