पोहरादेवीला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, अपघातात पाच ठार

0
210

यवतमाळ, दि. १६ (पीसीबी) – यवतमाळमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. पुसद दिग्रस मार्गावर असलेल्या बेलगव्हान घाटात अॅपे वाहनाला अपघात झाला आहे. अॅपे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय.

यवतमाळच्या बेलगव्हान घाटात हा भीषण अपघात झाला आहे. सर्व प्रवासी हे मोहा तांडा, टोकी तांडा, पांढुरणा, सिंघनवाडी येथील रहिवासी आहेत. पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी आयोजित केलेल्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अॅपे उलटला. या अपघात इतकी भीषण होता की वाहन उलटल्यानंतर त्यातील 5 प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर, 11 प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती समजताच जखमी प्रवाशांना पुसदच्या मेडिकेअर रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले होते. काही प्रवासी हे किरकोळ जखमी आहेत. तर काहींना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याठिकाणी आमदार इंद्रनील नाईक व आमदार निलय नाईक यांनी भेट देऊन त्याची विचारपूस केल्याची माहितीही समोर येते आहे.

दरम्यान, गावाकडील भागात सार्वजनिक वाहनांची कमतरता असल्याने वाहतुकीसाठी खासगी अॅपेचा वापर केला जातो. मात्र, कधीकधी यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जातात. प्रवाशांची संख्या जास्त असल्याने वाहनांवर लोड येतो. अशावेळी हे अपघात घडले जातात. अनेकदा अशा प्रकरणांत आरटीओ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी केली जाते.

परळ हिंदमाता ब्रिजवर भीषण अपघात
मुंबईतील परळ येथील हिंदमाता ब्रिजवर भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरला आदळल्याने हा अपघात घडला आहे. ट्रिपल सीट बाईक चालवणं महागाच पडला आहे. या अपघातात दोन तरुणीसह एका मुलाने जीव गमावला आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांकडून अधिक कारवाई करण्यात येत आहे.