पोलीस भरती करण्याचे आश्वासन देऊन तरुणीवर बलात्कार

0
252

पुणे, दि. २२ (पीसीबी): पोलीस भरतीपूर्व केंद्र चालवणाऱ्या चालकाने तो गॅझेटेड अधिकारी असल्याची बतावणी करीत परीक्षा न देता पोलीस भरती करण्याचे आश्वासन देऊन अनेकांची फसवणूक केली. यासोबतच एका तरुणीसोबत रिलेशनमध्ये राहून त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय चंद्रकांत चंद्रशेखर प्रधान (वय २७, रा. सय्यद नगर, महंमदवाडी, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला नाना पेठ परिसरात राहते. हा सर्व प्रकार दोन ऑगस्ट २०२३ ते आजपर्यंत वानवडी येथील जगताप चौकात असलेल्या अजिंक्य अकॅडमी मध्ये घडली. अक्षय प्रधान हा अजिंक्य अकॅडमी नावाने पोलीस भरती पूर्व अकॅडमी चालवतो. त्याने सर्व विद्यार्थ्यांना तो गॅझेटेड अधिकारीच असल्याची बतावणी केली होती.

पीडित महिलेला परीक्षा न देता पोलीस भरती करून देतो असे आश्वासन त्यांनी दिले होते. या अकॅडमीमध्ये तिला बोलावून तिच्याशी जवळीक साधली. ‘आपण रिलेशनमध्ये राहू. तू मला आवडतेस’ असे म्हणून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या महिलेने त्याला दूर ढकलून दिले असता तिचे जबरदस्तीने कपडे काढून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणाला काही सांगितले तर पोलीस भरती करून देणार नाही अशी धमकी दिली.

त्यानंतर तिच्याकडून वेळोवेळी एक लाख तीस हजार रुपये घेतले. तिच्या एचडीएफसी कार्डवरून १४ हजार ५०० रुपयांचा सॅमसंग मोबाईल आणि ५९ हजार रुपयांचा आयफोन देखील विकत घेतला. यासोबतच अकॅडमीमधील इतर मुलांकडून देखील पोलीस भरती करून देतो असे सांगत पैसे उकळण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. आरोपीने या मुला मुलींसोबत पोलीस भरती झाल्याचे दर्शवित त्यांचा सत्कार केलेले फोटो टाकून प्रत्यक्षात कोणालाही भरती न करता फसवणूक केल्याचे समोर आले आहे.