पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघालेल्या मालकाला भुमकर चौकात शस्त्राने भोकसले कामगारास अटक

0
726

वाकड, दि. २७ (पीसीबी): ट्रकवरील कामगाराला कामावरून काढून टाकण्याच्या कारणावरून कामगाराने ट्रक मालकासोबत वाद घातला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघालेल्या मालकाला भुमकर चौकातील सिग्नलवर गाठून कामगाराने धारदार शस्त्राने भोकसले. ही घटना सोमवारी (दि. 25) सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास भुमकर चौक, वाय जंक्शन, वाकड येथे घडली.

शिवाप्पा आप्पा अण्णा अडागळे (वय 42, रा. मुकाई चौकाजवळ, किवळे) असे जखमी मालकाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार दिगंबर शिवाजी गायकवाड (वय 28, रा. डुडुळगाव, आळंदी रोड, ता. हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिगंबर हा फिर्यादी यांच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. त्याला कामावरून काढण्याचा फिर्यादी विचार करत होते. त्या कारणावरून तो फिर्यादी यांचा आयशर टेम्पो घेऊन जात होता. फिर्यादी यांनी दिगंबर गायकवाड याला टेम्पो घेऊन जाण्यास विरोध केला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी दिगंबर याने फिर्यादी शिवाप्पा यांना शस्त्राने डोक्यात मारून त्यांना जखमी केले.

या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी शिवाप्पा हे पोलीस ठाण्यात जात होते. भुमकर चौकातील वाय जंक्शन येथे आले असता आरोपी दिगंबर याने फिर्यादी यांना अडवून त्यांना धारदार शस्त्राने जीवे मारण्याच्या उद्देशाने भोकसले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.