पोलीस चौकी समोरच दोन गटात जुंपली, परस्पर विरोधात गुन्हे दाखल

0
280

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – जमिनीच्या वादातून दोन गटात पोलीस चौकीसमोरच तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटांनी परस्पर विरोधात गुन्हे नोंदवले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. १५) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पिंपरी पोलीस चौकीसमोर घडली.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अशरफ रज्जाक शेख, स्वप्नील शंकर पारखे, सागर शंकर पारखे, प्रशांत प्रकाश पारखे आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर आणि प्रशांत या दोघांना अटक केली आहे. फिर्यादी महिलेने त्यांच्या हिश्याची जमीन आरोपी अशरफ याला विकली नाही म्हणून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना मारहाण केली. फिर्यादीच्या हाताला चावा घेऊन जखमी केले. फिर्यादीच्या नातीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला.

याच्या परस्पर विरोधात प्रशांत पारखे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार महिलांसह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत यांच्या आत्याने पोलीस चौकीत केलेल्या तक्रार अर्जावरून चौकशीसाठी दोन्ही गटातील संबंधितांना पोलिसांनी बोलावून घेतले. चौकशी सुरु असताना दोन्ही गटात वाद सुरु झाला. पोलिसांनी सर्वांना चौकीतून बाहेर जाण्यास सांगितले असता आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना मारहाण केली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.