पोलीस कारवाईतून महापालिकेला मिळाले 56 लाख

0
282

पिंपरी,दि.०२(पीसीबी) – बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी तसेच पे अ‍ॅन्ड पार्कला बळकटी यावी, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना पाच टोइंग व्हॅन दिल्या. या कारवायांमधून काही रक्कम महापालिकेला देण्याचा निर्णय झाला. गेल्या सहा महिन्यांत महापालिकेच्या तिजोरीत 55 लाख 77 हजार 394 रुपये जमा झाले आहेत.

महापालिकेने या पूर्वीच शहरात पे अ‍ॅन्ड पार्क योजना राबविण्यास सुरुवात केली. मात्र, पे अ‍ॅन्ड पार्कच्या ठिकाणी वाहने उभी न करता नागरिक कुठेही बेशिस्तपणे वाहने उभी करीत असल्याचे दिसून आले. अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी पोलिसांना केली. मात्र कारवाईसाठी आमच्याकडे टोर्इंग व्हॅन नसल्याचे पोलिसांनी महापालिका आयुक्तांना सांगितले. यामुळे महापालिकेने कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना टोर्इंग व्हॅन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात आली.

पाच टोर्इंग व्हॅन आणि प्रत्येक टोर्इंग व्हॅनवर पाच कर्मचारी असा संच ठेकेदाराने देण्याचे निश्चित केले. त्यासाठी टोर्इंग व्हॅनचा ठेका घेणा-या ठेकेदारास दरवर्षी एक कोटी 10 लाख रुपये देण्याचे निश्चित केले. त्यानुसार 5 एप्रिल 2022 पासून वाहतूक पोलिसांनी टोर्इंग व्हॅनद्वारे शहरातील बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईला सुरवात झाली. त्यामध्ये नो – पार्किंगचा दंड 500 रुपये, टोर्इंग व्हॅन चार्जेस 200 रुपये, जीएसटी 36 रुपये असा एकूण 736 रुपयांचा दंड आकारण्यास सुरवात झाली. नो – पार्किंग’चा दंड वाहतूक पोलिसांकडून शासनाच्या खात्यात आणि टोर्इंग व्हॅनचे चार्जेस महापालिकेला असे ठरविण्यात आले. त्यानुसार आत्तापर्यंत वाहतूक पोलिसांनी टोर्इंग चार्जेसचे 55 लाख 77 हजार 394 रुपये महापालिकेकडे जमा केले.