वाकड, दि. 24 (पीसीबी) : तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज आढळून आले आहे. या गुन्ह्यात अटक करण्याची भिती दाखवत एका तरुणाची 23 लाख 98 हजार 457 रुपयांची फसवणूक केली. ही घटना विजयनगर, काळेवाडी येथे 29 ऑगस्ट रोजी घडली.
प्रणव प्रदीप धैसास (वय 32, रा. विजयनगर, काळेवाडी) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हिडिओ कॉलवरील तोतया पोलीस आणि मोबाइल धारक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रणव यांना 59 ऑगस्ट रोजी दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास 9030654064 या मोबाइलवरून फोन आला. आपण फेडएक्स कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये खोटे पासपोर्ट व ड्रग्ज असल्याचे सांगितले. याबाबत अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असल्याचे सांगत तो कॉल सायबर पोलिसांच्या प्रदीप सावंत यांच्याकडे जोडून दिल्याचे सांगितले. त्या तोतया पोलिसाने फिर्यादी यांना त्यांचा आधार नंबर मनी लॉन्ड्रींग, काळा पैसा, क्रिप्टो करन्सीसाठी वापरला असून तो गंभीर गुन्हा असल्याचेही सांगितले. याप्रकरणी फिर्यादी प्रणव यांना अटक करण्याची भिती दाखवून फिर्यादी यांना व्हिडीओ कॉल करण्यास सांगून त्यांच्या बँक खात्यावरील 23 लाख 98 हजार 457 रुपये पाठविण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.