पोलीस उपआयुक्त बोलत असल्याचे भासवून महिलेची साडेनऊ लाखांची फसवणूक

0
296

निगडी, दि. २८ (पीसीबी) – महिलेच्या नावाने मुंबई येथून तैवान येथे बेकायदेशीर पार्सल जात असल्याचे सांगत एका तोतया पोलीस उपायुक्ताने महिलेला नऊ लाख साठ हजारांचा गंडा घातला. हा प्रकार नऊ मार्च रोजी निगडी प्राधिकरण येथे घडला. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने ‘मी फेडेक्स कुरिअर कंपनी मधून बोलत आहे. तुमच्या नावांचे मुंबई येथून तैवान करिता बेकायदेशीर पार्सल जात आहे’, असे सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेतून पोलीस उप आयुक्त अजयकुमार बंसल बोलत असल्याचे खोटी ओळख निर्माण करून फिर्यादी महिलेचे बँकेचे डिटेल्स घेतले.

फिर्यादी महिलेच्या बँक खात्यातून बेकायदेशीर व्यवहार होत असल्याचे सांगून बँकेतील पैसे इतर खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्याचा तोतया पोलीस उपायुक्ताने सल्ला दिला. त्या माध्यमातून तीन ट्रांजेक्शनद्वारे महिलेची नऊ लाख 60 हजार 999 रुपयांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.