पोलीस आयुक्तालयाच्या कामावर दादा खूश-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पोलिसांच्या कामाचा आढावा

0
85

57 चारचाकी वाहनांचे लोकार्पण

चिंचवड, दि. 10 (पीसीबी) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कामाचा आढवा घेतला. गेल्या काही काळात पोलीस आयुक्तालयामध्ये कोणकोणती कामे झाली आहेत, पोलीस ठाण्यांच्या इमारती, पोलीस भरती, वाहनांची संख्या, गुन्ह्यांची संख्या या सर्व गोष्टींची त्यांनी माहिती घेतली. या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर पोलिसांचे अभिनंदन करून लोकांना अभिमान वाटेल, असे काम करत रहा, असा सल्लाही त्यांनी दिला.

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाला 57 चारचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वाहनांचे लोकार्पण उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बुधवारी (9 ऑक्टोबर) करण्यात आले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या ‘स्थायी आदेश’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अण्णा बनसोडे, आश्विनी जगताप, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, शिवाजी पवार, स्वप्ना गोरे, माधूरी कांगणे आदी या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोलीस आयु्क्त चौबे यांनी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे पोलिसांच्या कामाची माहिती दिली. गेल्या दोन वर्षांत पोलीस आयुक्तालयात कोणती कामे झाली, किती पोलीस ठाण्यांना नविन इमारती मिळाल्या, सीएसआर फंडातून कोणती कामे झाली, गुन्ह्यांचा आढावा, एमआयडीसीतील पोलिसांचे उपक्रम, वाहतूक समस्या सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न या सर्व गोष्टींची माहिती या द्वारे देण्यात आली. पवार यांनी पोलिसांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर पोलीस आयुक्त चौबे यांचे कौतूक केले. लोकांना अभिमान वाटेल असेच काम करत रहा, असा सल्लाही दिला.

महिला सुरक्षीततेकडे जास्त लक्ष द्या….

काही दिवसांपूर्वी पुण्यातील बोपदेव घाटात एका तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. त्या पार्श्वभुमीवर पिंपरी – चिंचवड शहरात महिलांच्या सुरक्षीततेसाठी पोलिसांनी काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती अजित पवार यांना देण्यात आली. त्यावर महिलांच्या सुरक्षीततेकडे जास्त लक्ष द्या, अशी सूचना त्यांनी पोलिसांनी केली.

पोलिस आयुक्तालयाला मिळालेल्या 57 वाहनांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यत्र्यांनी पोलिस आयुक्तालायाच्या कामकाजाचा आढावा घेतला. पोलिसांच्या कामाचे कौतूक केले. तसेच काही गोष्टींबाबत सूचना केल्या आहेत.

– विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त

मंजूरी मिळालेली महत्वाची कामे…

– पोलीस आयुक्तालय कार्यालयासाठी चिखली येथे 15 एकर जागा

– पोलिसांच्या निवासस्थानासाठी वाकड येथे नऊ एकर जागा

– बावधन, संत तुकारामनगर, काळेवाडी, दापोडी अशा चार पोलिस ठाण्यांना मंजूरी

– पोलीस आयुक्तालय नविन इमारतीच्या आरखड्यास मंजूरी

– पिंपरी पोलीस ठाणे आणि 200 निवासस्थानांसाठी निधी मंजूर

– आळंदी पोलीस ठाण्याच्या नविन इमारतीचा आरखडा मंजूर

– महाळूंगे पोलीस ठाण्यासाठी सीएसआर फंडातून १६ कोटींचा निधी मंजूर