शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी राबविलेल्या एका विशेष मोहिमेत गुन्हे शाखांमध्ये गुंडा विरोधी पथक तर पोलीस ठाण्यांमध्ये भोसरी पोलीस ठाणे प्रथम आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत सरस कामगिरी करणाऱ्या पथक प्रमुख आणि ठाणे प्रमुखांचा पोलीस आयुक्तांनी सन्मान केला.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून 7 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त आरोपींना अटक करण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. या मोहिमेत प्रथम येणाऱ्या तीन पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखांना प्रशस्तीपत्र व योग्य बक्षीस दिले जाणार तर कमी दर्जाची कामगिरी करणाऱ्या तीन पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखांची नोंद घेतली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते. त्यामुळे शहर पोलीस हद्दीतील 18 पोलीस ठाणे, गुन्हे शाखेचे पाच युनिट आणि इतर पाच शाखा यांच्यात चांगलीच चुरस रंगली.
या मोहिमेत शहर हद्दीतील 12 फरार आरोपींना अटक करण्यात आली. पाहिजे असलेल्या 204 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. अजामीनपात्र गुन्ह्यात बाहेर असलेल्या 110 आरोपींना वॉरंट बजावणी करून अटक करण्यात आली. तर सीआरपीसी कलम 82 प्रमाणे जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या 58 कारवाया झाल्या. अवघ्या महिनाभरात झालेल्या एवढ्या मोठ्या कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले. सोमवारी (दि. 5) झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत विशेष मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पोलीस आयुक्तांनी सन्मान केला.
उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस ठाणे
पोलीस ठाणे (मिळालेले गुण)
प्रथम – भोसरी पोलीस ठाणे (366)
द्वितीय – पिंपरी पोलीस ठाणे (328)
तृतीय – देहूरोड पोलीस ठाणे (162)
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुन्हे शाखा
गुन्हे शाखा (मिळालेले गुण)
प्रथम – गुंडा विरोधी पथक (130)
द्वितीय – युनिट तीन (96)
तृतीय – युनिट एक (85)
असे झाले गुणांकन
कारवाई प्रकार गुण
फरारी आरोपी अटक करणे 25
पाहिजे आरोपी अटक करणे 5
अजामीनपात्र वॉरंट बजावणी करून अटक करणे 1
सीआरपीसी कलम 82 प्रमाणे जाहीरनामा प्रसिद्ध करणे 10