पिंपरी, दि. १५ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांची तयारी सुरु आहे. पोलिसांकडून देखील निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बुधवारी (दि. १३) हिंजवडी पोलीस ठाण्यात भेट देऊन आढावा घेतला. तसेच नागरिकांशी चर्चा करून त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या.
दरवर्षी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्व पोलीस ठाण्यांची वार्षिक तपासणी केली जाते. वर्षभरात दाखल आणि उकल झालेले गुन्हे, पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध दृढ करणे तसेच पोलिसांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्याबाबत वार्षिक तपासणीमध्ये मार्गदर्शन केले जाते.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बुधवारी सकाळी हिंजवडी पोलीस ठाण्यात भेट दिली. पोलीस ठाण्यातील सर्व अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.
पुढील काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे. त्यादृष्टीने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील मतदान केंद्र, निवडणूक काळात उपद्रव करणा-या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या. त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पोलीस कल्याण योजनेतून अडचणींच्या काळात मदत घेण्याबाबत सांगण्यात आले.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांचा दरबार घेतला. त्यांच्या अडचणी जाणून घेत त्याबाबत योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या.