वाकड, दि. 11 (पीसीबी) : पोलीस असल्याची बतावणी करत अनोळखी व्यक्तींनी वाकड मधील एका व्यक्तीच्या नावाने खोटे पासपोर्ट आणि अमली पदार्थ पार्सल द्वारे आले असल्याचे सांगितले. तसेच याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून केव्हाही अटक होऊ शकते अशी भीती घालत व्यक्तीची सहा लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना सहा ऑगस्ट रोजी शिवकॉलनी, वाकड येथे घडली.
याप्रकरणी 31 वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9211807897 मोबाईल क्रमांक धारक आणि स्काइप अकाउंट धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो फेडेक्स कुरिअर कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या नावाने खोटे पासपोर्ट व अमली पदार्थ असलेले पार्सल आल्याचे सांगितले. या प्रकरणी फिर्यादी यांच्यावर अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचेही फोनवरील व्यक्तीने सांगितले.
त्यानंतर फोनवरील दुसऱ्या व्यक्तीने तो सायबर पोलीस असल्याची बतावणी केली. त्याने त्याचे नाव प्रदीप सावंत असे सांगितले. फिर्यादीचा आधार कार्ड क्रमांक मनी लॉन्ड्रींग, हवाला, काळा पैसा यासाठी वापरला असून हा खूप गंभीर गुन्हा आहे. त्यामध्ये तुम्हाला कधीही अटक होऊ शकते अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर फिर्यादी यांना स्काइपवर व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. फिर्यादी कडून सहा लाख रुपये घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.