पोलिसात दिलेली तक्रार मागे घे म्हणत जीवे मारण्याची धमकी

0
576

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – दुचाकी वरून जाणाऱ्या एका वकिलाला अडवून पोलिसात दिलेली तक्रार मागे घे असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 25 मे रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास सेक्टर नंबर 11 भोसरी येथे घडला.

ज्ञानेश्वर सिताराम कराळे (वय 56, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. श्रीहरी पांडुरंग डांगे आणि दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मे रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी हे देहूरोड येथून सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली 14 येथे दस्त नोंदणीच्या कामासाठी दुचाकीवरून जात होते. ते सेक्टर नंबर 11 भोसरी येथे आले असता त्यांच्या पाठीमागून एका दुचाकीवरून दोन अनोळखी इसम आले. त्यांनी फिर्यादी यांना जबरदस्तीने थांबवून ‘डॉ श्रीहरी डांगे यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घे. तुला जर हे प्रकरण मिटवायचे नसेल तर तुला आमचा हिसका दाखवतो. तुला गोळ्या घालून खल्लास करून टाकतो’ अशी धमकी दिली. तसेच धमकी देणाऱ्याने सारखे त्याच्या कमरेला हात लावला. त्याच्या कमरेला घातक शस्त्र असण्याची शक्यता फिर्यादी यांना वाटत होती. धमकी दिल्यानंतर अनोळखी दोघेजण दुचाकीवरून निघून गेले.

जानेवारी 2023 मध्ये फिर्यादी यांनी डॉ. श्रीहरी डांगे यांच्या विरोधात 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याबाबत तळेगाव दाभाडे येथे तक्रार अर्ज केला आहे. मात्र तो प्रकार देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तो तक्रार अर्ज देहूरोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यावरून हा प्रकार झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.