पोलिसात तक्रार दिल्याने तरुणावर खुनी हल्ला

0
733

चिखली, दि. १८ (पीसीबी) – दोन महिन्यांपूर्वी मारहाण केल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. १३) रात्री पावणे आठ वाजता मोरेवस्ती, चिखली येथे घडली.

रुपेश प्रमोद ठाकूर (वय २४, रा. मोरेवस्ती, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी गुरुवारी (दि. १६) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खवचे अज्या उर्फ अजय भारत जाधव (वय २३), पपड्या उर्फ अजय शामराव सोनवणे (वय २४, दोघे रा. मोरेवस्ती, चिखली) आणि एक साथीदार (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुपेश आणि त्यांचा मित्र लखन बसवराज गाडेकर यांनी १५ एप्रिल रोजी आरोपींच्या विरोधात मारहाण आणि तोडफोड केल्याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून आरोपी आपसात संगनमत करून दुचाकीवरून आले. आरोपी पपड्या आणि अनोळखी साथीदाराने फिर्यादी यांचे हात पकडले आणि आरोपी खवचे अज्या याने कोयत्याने फिर्यादीवर वार केले. यात फिर्यादी यांच्या खांद्याला दुखापत झाली. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रुपेश ठाकूर आरोपींच्या तावडीतून पळून जात असताना आरोपींनी फिर्यादी यांची दुचाकी, त्यांच्या आईची दुचाकी, सिद्धेश्वर सोपान करताडे यांची दुचाकी आणि अन्य दोन दुचाकी वाहनांवर कोयत्याने व दगडाने मारून पाच दुचाकींचे नुकसान केले. वाहनांची तोडफोड केल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी करून दहशत निर्माण केली. आरोपींच्या दहशतीला घाबरून नागरिकांनी त्यांचे दरवाजे लावून घेतले.