पोलिसांनी सापळा लाऊन केला ‘एवढ्या’ लाखांचा गांजा जप्त

0
36

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कुदळवाडी येथे कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 14 किलो 76 ग्रॅम गांजासह आठ लाख 93 हजार 800 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. 29) दुपारी सव्वातीन वाजता करण्यात आली.

अजरुद्दिन मुनीर शहा (वय 40, रा. चिखली), हमीदउल्ला नसीमउल्ला खान (वय 24, रा. चिखली), रोहित शर्मा (रा. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अजरुद्दिन आणि हमीदउल्ला यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय दौंडकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुदळवाडी येथे हिंदुस्थान भंगार गोडाऊन जवळ दोघेजण गांजा घेऊन आले असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन अजरुद्दिन आणि हमीदउल्ला यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 14 किलो 76 ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजासह दुचाकी, तीन मोबाईल फोन असा एकूण आठ लाख 93 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींनी हा गांजा विक्रीसाठी जवळ बाळगला होता. तसेच त्यांनी तो गांजा आरोपी रोहित शर्मा याच्याकडून आणला असल्याचे त्यांनी तपासात सांगितल्याने रोहित शर्मा याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.