पोलिसांना सलाम…बरं झालं.. , हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे… इथे अशीच शिक्षा मिळते…

0
78

-अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

ठाणे, दि. 24 (पीसीबी) : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतच अक्षयचा एन्काऊंटर झाला असल्याची माहिती समोर येत आहे. अक्षयला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर 3 गोळ्या झाडल्या असल्याची माहिती आहे. या प्रकरणावर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असले तरीही महाराष्ट्र पोलिसांचं मात्र जनेतेने अभिनंदन केलं आहे.

बदलापूरच्या एका शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर अक्षयने लैंगिक अत्याचार केला होता. बदलापूर रेल्वे स्थानकावर नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. तसेच या प्रकरणाचं गांभीर्यही लक्षात आलं. तेव्हापासूनच आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी वांरवार होत होती. त्यातच आज अक्षयचा एन्काऊंटर झाल्याची बातमी समोर आली.

सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट्स करत महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, अभिनंदन महाराष्ट्र पोलीस. दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, एक राक्षस संपला. आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, पोलिसांना सलाम…बरं झालं.. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे… इथे अशीच शिक्षा मिळते… अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जनतेमधून येत आहेत.

तळोजा जेलमधील सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात होते, त्यावेळी हा प्रकार घडला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांना लागली गोळी लागली आहे. साधारण 6.30 च्या आसपास पोलीसांची टीम मुंब्रा बायपास जवळ आली. तेव्हा आरोपीने एका कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार केला. पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर झालेल्या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला. अक्षयच्या चेहऱ्यावर गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे.