पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी जे लागेल ते द्यायला तयार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

0
214

पिंपरी,दि.22 (पीसीबी)- जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 21) पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा केला. महापालिकेत आढावा घेतल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयास देखील भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून पोलिसांच्या वाहनांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अद्ययावतीकरणासाठी जे लागेल ते द्यायला आपण तयार असल्याची ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली.

पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रथमच पोलीस आयुक्त कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी आयुक्तालयाच्या अडचणी जाणून घेतल्या. शहरात खूप काही करण्यासारखे असून दिवाळीनंतर प्रत्येक्ष फिल्डवर एक दिवस फिरून आढावा घेणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. पोलीस आयुक्तालयाला सध्या वाहनांची आवश्यकता असल्याने वाहनांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून दोन कोटी रुपये निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. त्यासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे असणे आवश्यक आहे. पोलीस आयुक्तालय अद्ययावत करणे आवश्यक असून त्यासाठी जे लागेल ते द्यायला तयार आहे. नवीन सायबर पोलीस ठाणे तयार करा, अशा सूचना पोलिसांना दिल्याचे पाटील म्हणाले. राज्यात नवीन पोलीस भरतीची प्रक्रिया महिनाभरात सुरु होईल. त्यात पिंपरी चिंचवड शहरासाठी २०० पदांची भरती केली जाईल. यापूर्वी 720 पोलीस शिपाई पदांची भरती केली असून लवकरच ते मनुष्यबळ फिल्डवर येणार आहे. आणखी मनुष्यबळ मिळाल्यास त्याची पोलिसिंगसाठी मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.