पोलिसांची तत्परता ठरली ‘जीवनदायी’; बहिणीच्या एका फोनमुळे तरुणीला मिळाले जीवदान

0
71

​पिंपरी, दि. २१ शहरात आत्महत्यांच्या वाढत्या घटनांनी चिंतेचे वातावरण असताना, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या तत्परतेमुळे एका तरुणीचे प्राण वाचल्याची एक दिलासादायक घटना समोर आली आहे. मोठ्या बहिणीकडून आलेला एक भावनिक मेसेज वाचून लहान बहिणीने वेळीच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिसांनी अत्यंत वेगाने प्रतिसाद देत ‘गोल्डन अवर’ (Golden Hour) मध्ये तरुणीला वैद्यकीय मदत मिळवून दिली, ज्यामुळे तिचा जीव वाचला.

​शनिवारी (दि. २० सप्टेंबर) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास, नेहरूनगर येथे राहणाऱ्या श्रद्धा शांताराम कांबळे (वय २५) यांनी त्यांची लहान बहीण सिद्धी (वय १९) यांना मोबाईलवर एक मेसेज पाठवला. “मी खूप दमली आहे. आई-वडिलांसाठी मी एक चांगली मुलगी बनू शकले नाही,” असे त्यात म्हटले होते.
​हा मेसेज वाचून घाबरलेल्या सिद्धी यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस मदत क्रमांक ११२ वर संपर्क साधला आणि “माझी मोठी बहीण तिच्या जीवाचे काहीतरी बरेवाईट करून घेईल, तिला कृपया वाचवा,” अशी विनंती केली.

​या गंभीर घटनेची माहिती मिळताच, ११२ क्रमांकावर कार्यरत असलेले पोलीस अंमलदार अमोल काकडे आणि देविदास बडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. श्रद्धा राहत असलेल्या खोलीला बाहेरून कडी लावलेली होती. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता, श्रद्धा यांनी डाव्या हाताची नस कापून घेतल्याचे दिसून आले. काकडे आणि बडे यांनी तिला तातडीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले.

​“रुग्णाला अत्यंत नाजूक अवस्थेत आणले होते, पण ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार सुरू झाल्याने तिचा जीव वाचवणे शक्य झाले,” अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. त्यांनी पोलिसांच्या या जलद आणि महत्त्वपूर्ण कामगिरीचे विशेष कौतुक केले.

​याप्रकरणी सिद्धी यांनी दिलेल्या जबाबानुसार, श्रद्धा यांना काही काळापासून अँक्झायटीचा त्रास होत असून, याच त्रासातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. आमची कोणाविरुद्धही कोणतीही तक्रार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे पोलीस अंमलदार अमोल काकडे आणि देविदास बडे यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक होत असून, मानसिक आरोग्याविषयी वेळीच मदत घेण्याचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे.