पोलंड वरून आलेले गिफ्ट मिळविण्यासाठी तरुणीने गमावले ११ लाख

0
258

ताथवडे, दि. ७ (पीसीबी) – पोलंडवरून आलेले गिफ्ट मिळविण्यासाठी तरुणीने ११ लाख ४९ हजार रुपये गमावले. कस्टम ड्युटी, हायकोर्ट, मनी लॉन्डरिंग आणि अन्य विविध चार्जेसच्या नावाखाली अनोळखी व्यक्तींनी पैसे घेत फसवणूक केल्याबाबत एका २४ वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १२ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत ताथवडे येथे घडला.

आकाश सिंग, प्रकाश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि एक अनोळखी महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश सिंग नावाच्या व्यक्तीने फिर्यादी तरुणीसोबत इंस्टाग्रामवरून मैत्री केली. विश्वास संपादन करून आकाश याने तरुणीसोबत व्हाट्सअपवर चॅटिंग सुरु केले. दरम्यान त्याने तरुणींसाठी पोलंडवरून सोने व हिऱ्याचे ज्वेलरी आणि रोख रक्कम असलेले एक पार्सल पाठवले असून ते कस्टम मधून सोडवून घे, असे सांगितले. मित्राने आपल्यासाठी पोलंडवरून महागडे पार्सल पाठवले आहे, या भाबड्या आशेने तरुणीने पार्सल घेण्याचे ठरवले. दरम्यान तिला एका महिलेने आणि प्रकाश नावाच्या व्यक्तीने फोन केले. त्या दोघांनी तरुणीकडून पार्सलची कस्टम ड्युटी, हायकोर्ट, मनी लॉण्डरिंग, पोलीस व्हेरिफिकेशन, ट्रान्सफर चार्जेस, इन्शुरन्स, स्टॅम्प चार्जेस आदींच्या बहाण्याने ११ लाख ४९ हजार ८० रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर भरण्यास सांगितले. एवढी मोठी रक्कम घेऊन आरोपींनी तरुणीला कोणतेही पार्सल न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.