पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अगरवालवर हिंजवडीत गुन्हा दाखल

0
165

72 लोकांची केली फसवणूक

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अगरवाल आणि त्याच्या साथीदारांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अगरवाल आणि त्याच्या साथीदारांनी बावधन येथील एका बांधकामं साईटमध्ये सदनिका घेतलेल्या 72 नागरिकांना ठरवून दिलेल्या सोयी सुविधा न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नॅन्सी ब्रह्मा असोसिएटस या प्रकल्पाचे विकसक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, राम कुमार अगरवाल, विनोद कुमार अगरवाल, नंदलाल किमतानी, आशिष किमतानी आणि इतर लोकांच्या विरोधात फसवणूकीसह महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विशाल अरुण अडसूळ (वय 42, रा. नॅन्सी ब्रह्मा रेसिडेन्सी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बावधन पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथील नॅन्सी ब्रह्मा रेसिडेन्सी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये फिर्यादी विशाल अडसूळ आणि इतर 71 जणांनी आरोपींकडून सदनिका खरेदी केल्या आहेत. सदनिका आणि इतर सोयीसुविधा देण्यासाठी ठरलेली रक्कम सर्वांनी आरोपी विकासकांना दिली आहे.

सोसायटीतील 72 जणांना झालेल्या व्यवहारात विकासकांनी नॅन्सी ब्रह्मा को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बावधन खुर्द या सोसायटीच्या मालकीच्या असणाऱ्या पार्किंग आणि अॅमिनीटीची जागा व मोकळी जागा सोसायटीला देणे बंधनकारक होते. असे असताना त्यांनी त्या प्रकल्पात एकूण तीन सोसायट्या तयार केल्या.

प्रत्येक सोसायटीला एकाच ठिकाणची अॅमिनीटीची आणि मोकळी जागा नकाशामध्ये दाखवली. नकाशामध्ये इतर लोकांच्या मदतीने वेळोवेळी फेरबदल करून नकाशे मंजूर करून घेतले. सोसायटीच्या सभासदांची कोणतीही परवानगी न घेता विकासकांनी सोसायटीच्या जागेवर विंटेज टॉवर आणि विंटेज हाय या नावाने दोन इमारती बांधल्या. विंटेज टॉवर अकरा मजली इमारत असून त्यात 66 व्यावसायिक कार्यालये तर विंटेज हाय या दहा मजली इमारतीमध्ये 27 सदनिका आणि 18 दुकाने बांधून नॅन्सी ब्रम्हा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या सोसायटीतील 72 सदनिका धारकांचा विश्वासघात करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.