चिंचवड पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे आपल्या ‘होमपीच’वर पिछाडीवर राहिले आहेत. वाकड आणि परिसरातील मतमोजणीमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप यांनी बाजी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनाही या भागात मताधिक्य घेता आलेले नाही.
मतमोजणीच्या सुरुवातीपासून अश्विनी जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. नाना काटे ज्या प्रभागातून नेतृत्व करता त्या पिंपळे सौदागर आणि रहाटणी भागात काटे यांना काहीसे मताधिक्य पहायला मिळाले. त्यानंतर वाकड, कस्पटे वस्ती, पिंपळे निलख या भागात अपक्ष उमेदवार राहुल कलाटे बाजी मारतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, २३, २४ आणि २५ व्या फेरीतील आकडेवारी पाहता कलाटे यांच्या वाट्याला कमी प्रमाणात मते आली आहेत.
चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपळे गुरव, सांगवी परिसरातील मतमोजणी होताना स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या सहानुभूतीचा ‘फॅक्टर’ मोठ्या प्रमाणात चाललेला दिसून आला.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच पाच ते दहा हजार मतांच्या आघाडीने अश्विनी जगताप आघाडी वरती होत्या. त्यात नाना काटे आणि राहुल कलाटे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी परिसरातील मतदान मोजणी पूर्ण झाली आहे. याठिकाणी जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. त्यानंतर झालेल्या मत मोजणीत सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव या भागातील मतमोजणीला सुरुवात झाली. त्यावेळी १० हजाराचे आघाडीवर असणारे जगताप यांनी थेट २५ हजारांच्या पेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली आणि विजयी झाल्या.
मतमोजणीतील ३१ व्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांनी १ लाख १६ हजार ७७८ मते मिळवली. दुसऱ्या क्रमांकावर नाना काटे यांनी ८७ हजार ८९ मते घेतली आणि ३९ हजार ७७१ मते घेवून राहुल कलाटे तिसऱ्या क्रमांकावर होते. या फेरीपर्यंत २९ हजार ६८९ मतांची निर्णायक आघाडी अश्विनी जगताप यांनी घेतली होती.
‘वंचित’च्या निर्णयाचा महाविकास आघाडीला फटका…
वास्तविक, चिंचवड विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे किमान १५ ते २० हजार मतदान आहे. वंचित आघाडीचे राष्ट्रीय नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी या निवडणुकीत राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला होता. या निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गट आणि वंचितच्या युतीची घोषणा झाली होती. त्यामुळे निवडणुकीत वंचितने कलाटे यांच्या पारड्यात मते टाकली. परिणामी, महाविकास आघाडीची काही मते कमी झाली, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.