पोकलेन मशीनच्या 22 लाखांच्या पार्टची चोरी

0
110

महाळुंगे,दि. ६ (पीसीबी)

मोकळ्या जागेत पार्क केलेल्या सात पोकलेन मशीनचे 22 लाख 75 हजार रुपयांचे पार्ट चोरी केले. तसेच आठव्या पोकलेन मशीनचे पार्ट चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 5) सकाळी निघोजे येथे उघडकीस आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

सागर विक्रमसिंग पाटील (वय 42, रा. विकासनगर, देहूरोड), राहुल बाळासाहेब मतसागर (वय 29, रा. दुर्गानगर, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी श्रीबाळ रघुनाथ पाटील (वय 48, रा. निगडी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅनी हेवी इंडस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीच्या 26 पोकलेन मशीन श्री बालाजी इन्फ्रा इक्विपमेंट कंपनी जयपूर यांच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. या मशीन निघोजे येथे मोकळ्या जागेत पार्क करण्यात आल्या होत्या. त्यातील सात पोकलेन मशीनचे 22 लाख 75 हजार रुपये किमतीचे डिस्प्ले आरोपींनी चोरी केले. त्यानंतर आणखी एका मशीनचा डिस्प्ले चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.