पैसे पाठवण्याच्या बहाण्याने तरुणीची 82 हजारांची फसवणूक

0
179

तुमच्या वडिलांनी मला पैसे पाठवण्यास सांगितले असल्याचे सांगत तरुणीची 82 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 29 मे रोजी डी वाय पाटील हॉस्पिटल, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9966497515 क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीला फोन करून आरोपीने ‘मला तुमच्या वडिलांनी 15000 रुपये पाठवण्यास सांगितले आहेत. ते पैसे मी तुम्हाला पाठवतो’ असे म्हणून सुरुवातीला 10 हजार रुपये व नंतर 50 हजार रुपये पाठवल्याचा टेक्स्ट मेसेज पाठवला. लगेच फिर्यादी यांना फोन करून ‘मला डोळ्याचा प्रॉब्लेम असून तुम्हाला पाच हजार रुपये पाठवण्याऐवजी 50 हजार रुपये पाठवले आहेत. मी सध्या हॉस्पिटलमध्ये असून मला तात्काळ हॉस्पिटलचे बिल भरायचे आहे. माझ्याकडून तुम्हाला जास्तीचे 45 हजार रुपये आलेले आहेत. ते मला मी एक गुगल पे नंबर पाठवतो त्यावर परत पाठवा’ असे सांगितले. फिर्यादी यांना एक मोबाईल नंबर पाठवला आणि आरोपीने त्यांना वारंवार फोन करून पैसे परत पाठवण्यास सांगितले.

फिर्यादी ड्युटीवर असल्याने व कामांमध्ये खूप व्यस्त असल्याने त्यांनी आरोपीने सांगितलेल्या युपीआय आयडीवर 45 हजार रुपये पाठवले. त्यानंतर त्यांनी बँक खाते तपासले असता त्यांच्या खात्यावर कोणतीही रक्कम जमा न झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीला फोन करून पैसे न आल्याबाबत कल्पना दिली. त्यानंतर आरोपीने ‘मला दुसऱ्याला संपर्क करायचा होता परंतु चुकून मी तुम्हाला संपर्क केला असून मी तुमचे पैसे परत पाठवतो’ असे सांगितले. आरोपीने तरुणीला एक स्कॅनर पाठवला. त्यावर क्लिक केले असता तरुणीच्या खात्यावर पाच रुपये जमा झाले. त्यानंतर आरोपीने आणखी दोन स्कॅनर पाठवले. त्यावर क्लिक करण्यास सांगितले असता फिर्यादी यांनी दोन्ही स्कॅनरला क्लिक केले. त्यावेळी त्यांच्या खात्यातून प्रथम दोन हजार रुपये आणि त्यानंतर 35 हजार रुपये डेबिट झाले. आरोपीने तरुणीकडून एकूण 82 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.