पुणे दि . ७ ( पीसीबी ) : हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून बुधवार पेठेत देहविक्रय करणाऱ्या महिलेचा एका रिक्षाचालकाने ओढणीने गळा आवळून खून केला. ही घटना धायरीतील रायकर मळा परिसरात घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे.
श्यामली कमलेश सरकार (वय ४०, रा. रायकर मळा, धायरी, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नितीन चंद्रकांत पंडित (वय ५१ ,रा. धायरी, सिंहगड रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस कर्मचारी नितीन तनपुरे यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामली सरकार आणि आरोपी नितीन पंडित हे एकमेकांना ओळखत होते. श्यामली बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत देहविक्रय करायची. पंडित तिला रिक्षातून दररोज बुधवार पेठेत सोडायचा. दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाले होते. पंडितने तिला ४० ते ५० हजार रुपये उसने दिले होते.
मात्र पंडितने तिला पैसे परत मागितले होते तेव्हा ती पैसे परत देण्यास ती टाळाटाळ करू लागली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. बुधवारी (४ जून) दुपारी चारच्या सुमारास पंडित तिला घेण्यासाठी धायरीतील रायकर मळा परिसरात गेला. श्यामलीच्या फ्लॅटमध्ये तो गेला. तिथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादातून पंडितने तिचा ओढणीने गळा आवळून खून केला.
त्यानंतर पंडित हा बुधवारी रात्री नांदेड सिटी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने श्यामली सरकारचा खून केल्याची कबुली दिली. पंडितला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गुुरुदत्त मोरे यांनी दिली. पोलीस निरीक्षक मोरे याप्रकरणाचा तपास करत आहेत.











































