पैशांची गरज असल्याचे भासवून तीन लाखांची फसवणूक

0
139

पिंपरी,दि.२५(पीसीबी) – मित्राला दिल्ली येथे पैशांची गरज असल्याचे भासवून चिंचवड मधील एका व्यावसायिकाला दिल्लीत पैसे देण्यास सांगितले. मित्राला गरज असल्याचे समजल्याने व्यावसायिकाने देखील जास्त चौकशी न करता पैशांची दिल्ली येथे व्यवस्था केली. मात्र प्रत्यक्षात मित्राला पैशांची गरज नसून त्याने कोणतीही मदत मागितली नसल्याचे समोर आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. ही घटना शुक्रवारी (दि. २३) दुपारी चिंचवड येथे घडली.

राजेंद्र सुरेश जैन (वय ५६, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल जैन, संदीप जैन, दीपक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मित्र अनिल जैन यांचा फोटो वापरून फोन करत फोनवर बोलणारी व्यक्ती हे अनिल जैन आहेत असे भासवले. अनिल जैन यांच्या नावाने बोलणाऱ्या व्यक्तीने दिल्लीमध्ये तीन लाख रुपयांची तात्काळ गरज आहे. फिर्यादींनी दिल्ली येथे पैशांची व्यवस्था केल्यास त्यांना पुणे येथे कॅश आणून दिली जाईल, असे सांगितले. त्यामुळे फिर्यादींनी त्यांचा दिल्ली येथील मित्र शक्ती भाई यांच्याकडून आरोपीस पैसे दिले. आरोपींनी दिल्ली येथे पैसे घेतल्यानंतर ठरल्या प्रमाणे फिर्यादीस पुणे येथे पैसे न देता त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.