पेपर विक्रेत्या गुणवंत विद्यार्थ्याला नाना काटे यांच्याकडून सायकल भेट

0
198

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – समाजातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात पेपर वाटप करणारा इयत्ता आठवीतील सुजित टारझन सिंग या विद्यार्थ्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक नाना काटे यांनी सायकल व स्कूल बॅग भेट देवून मदतीचा हात दिला आहे. त्याच्या जिद्द व चिकाटीचा गौरव केला.

नाना काटे आपल्या प्रभागातून दररोज समस्या व विकासकामे याची पाहणी करत असतात. यावेळी त्यांच्या नजरेत सुजित टारझन सिंग हा मुलगा पिंपळे सौदागर परिसरात दैनंदिन पेपर टाकण्याचे काम करत असल्याचे दिसून आले. नाना काटे यांनी त्याला थाबवून त्याची माहिती घेतली. सुजित हा वडीलासोबत राहत असून तो दररोज १५० घरी जावून पेपर टाकत आपले शिक्षण पूर्ण करत असल्याचे माहिती समोर आली. त्याचे वडील टारझन सिंग एका सोसायटीमध्ये वॉचमन म्हणून नोकरी करतात. घरची आर्थिक परिस्थिती कढीण असल्याने शिक्षणाबरोबर त्याला लहान मोठी कामे करावी लागत आहे. अशा जिद्दी, गरीब व गरजू विद्यार्थ्याला “एक हात मदतीचा” म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी सायकल सोबत स्कूल बॅग भेट देत त्याच्या लढवय्या व जिद्दीला मोलाचा हातभार लावला.

15 ऑगस्ट रोजी नाना काटे यांचा वाढदिवसाच्या कार्यक्रमांची तयारी असतानाही वेळ काढून सुजित याला नानांनी आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. त्याचा दैनंदिन दिनक्रम, शैक्षणिक धडपड व घरातील आर्थिक बजेट बसवण्यासाठी करत असलेली कष्टाची कामे आणि त्याच्या कुटुंबातील सर्वांची माहिती घेतली. हे एकल्यानंतर त्याच्या वडीलांना फोन करून मनातील संकल्पना सांगितली. शाळेतील गरजू विद्यार्थ्यांची आपल्या घरातील आर्थिक परिस्थितीचा परिणाम होवू नये. त्यांची शिक्षण घेताना त्याला पायी चालत जावू नये म्हणून सायकल भेट देण्याची संकल्पना सांगितली. याचा सुजितच्या वडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी मुलाला सायकल भेट दिल्यानंतर नानांचे आभार व्यक्त केले.

पेपर वाटताना प्रभागात अनेक विकास कामाबरोबर नागरिकांच्या समस्या जाणून घेताना नेहमी नगरसेवक नाना काटे यांना मी पाहत असत. त्यांनी मला दिलेली सायकलचा उपयोग माझ्या शैक्षणिक काळात अमूल्य ठेवा राहणार आहे. सायकलमुळे माझा वेळ व पायी जाण्याचे कष्ट वाचणार आहे याचा सदुपयोग पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडेल असा विश्वास सुजितने व्यक्त केला.

नाना काटे म्हणाले की, समाजासाठी नेहमी या जीवनात काहीतरी करण्याची इच्छा असते. दोन दिवसांपूर्वी कोविड सारख्या कठीण परिस्थितीत पालकांनी प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देता त्यांचा शैक्षणिक दर्जा कायम ठेवला याबद्दल पालकांचे आभार व्यक्त करताना वेगळा आनंद मिळाला. तसाच आनंद सुजित याला हातभार लावताना वाटला. समाजात अशीही काही मुले आहेत जी आपल्या घरच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी कष्ट करत शिक्षण घेत आहेत. अशा शिक्षण घेणाऱ्या सुजित सारख्या मुलाला मदत करताना वेगळा अभिमान वाटतो. त्यामुळे समाजातील उपेक्षित व गरजू मुलाला मदत करणे ही माझे प्रथम कर्तव्य मानतो असे नाना काटे यांनी म्हटले आहे.