‘पेट्रोकार्ड’च्या मर्यादेत वाढ !

0
322

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या महापालिका वाहनांमध्ये इंधन भरण्याकरीता “पेट्रोकार्ड” ही “कॅशलेस” सुविधा जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीला इंधन भरण्यासाठी या कार्डवर 10 हजार रूपयांची मर्यादा देण्यात आली होती. मात्र, ही रक्कम कमी पडत असल्याची अनेक विभागांनी लेखा विभागास कळविले होते. याची दखल घेऊन आता “पेट्रो कार्ड”ची मर्यादा 10 हजारांहून 30 हजारांवर करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी जारी केला आहे.

प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना जलदगतीने सेवा सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी पारदर्शक कामकाजाच्या दृष्टीने महापालिकेने संगणक प्रणालीचा अधिकाधिक वापर कामकाजात सुरु केला आहे. आर्थिक व्यवहार हा कॅशलेस असावा त्यादृष्टीने पेट्रोकार्ड सुविधा सुरु करून महापालिकेने कॅशलेस आर्थिक व्यवहार करण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले आहे.

महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाकरीता तसेच अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये येण्या जाण्याकरीता आणि कार्यालयीन कामास्तव फिरतीकरीता वाहनचालकासह कार्यालयीन वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या उपलब्ध करून दिलेल्या वाहनांच्या इंधनासाठी बॅंक ऑफ बडोदाच्या मार्फत “पेट्रो कार्ड”ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कार्डवर सुरूवातीला 10 हजार रुपये आगाऊ रक्कम आगाऊ दिली होती. मात्र, ही रक्कम कमी पडत असल्याची अनेक विभागांची ओरड होती. त्यामुळे 10 हजाराहून थेट 30 हजार “पेट्रो कार्डची”मर्यादा वाढविली आहे. कार्डमधील 20 हजार रूपये खर्च करून 10 हजार रूपयांची रक्कम कार्डवर शिल्लक ठेवावी. खर्च झालेल्या रकमेची देयके प्रतिपूर्तीसाठी लेखा विभागाकडे सादर करावीत, अशा सूचनाही मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी दिल्या आहेत