पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खाते उघडले, नेमबाजीत मनू भाकेरला कांस्यपदक

0
57

पॅरिस : भारताने पॅरिस ऑलिम्पिकमधील आपले पदकांचे खाते अखेर उघडले. मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक पटकावले. मनूने यावेळी १२ वर्षांचा दुष्काळ संपवत भारताला पदक जिंकवून दिले.
मनुची फायनलमध्ये सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या फेरीत तिने ५०.४ गुण कमावले होते. त्यानंतर तीन फेऱ्यांनंतर मनुच्या खात्यामध्ये १००.३ गुण होते. त्यानंतर मनु १२१.२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान झाली होती. त्यानंतर मनुचे १४०.८ गुण झाले होते आणि ती तिसऱ्या स्थानावर होती.

मनु भाकेरने शनिवारी दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे तिच्याकडून यावेळी तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. त्यामुळे मनु कशी कामगिरी करते, यावर तमाम भारतीयांच्या अपेक्षा होत्या. कारण भारताचे हे पहिलेच पदक ठरणार होते.
भारतीयांना ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पदकाचा वेध घेता आला नाही; पण मनू भाकेरने भारताच्या पदकाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. तिने शनिवारी झालेल्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारातील प्राथमिक फेरीत तिसरा क्रमांक मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे अन्य नेमबाज पहिल्या दिवशी लक्ष्यापासून दूर राहत असताना भारताच्या पदकाच्या आशा कायम राहिल्या.

शनिवारी मनूने ५८२ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला; मात्र तिची सहकारी रिदम संगवान ५७३ गुणांसह १५वी आली. तीन वर्षांपूर्वी टोकियोत पदकाचा वेध घेण्यात सातत्याने अपयश आल्यानंतर मनूला अश्रू आवरले नव्हते. त्या वेळी ती पात्रता फेरीत ५७५ गुणांसह बाराव्या स्थानी राहिली होती; मात्र या वेळी ती जास्त आत्मविश्वासाने सामोरी गेली. काही वेळा लक्ष्य पूर्ण भरकटल्यानंतरही ती शांत होती.

टोकियोपेक्षा सरस कामगिरी करण्याचा निर्धार मनूने केला. त्यासाठी तिने प्रशिक्षक जसपाल राणा यांच्यासह असलेला वादही संपवला. ती पहिल्या दोन फैरीनंतर चौथी होती. तिसऱ्या फैरीनंतर तिने दुसरा क्रमांक मिळवला होता. मात्र, पाचव्या फैरीतील एका प्रयत्नात तिच्याकडून आठ गुणांचा वेध घेतला गेला. त्यामुळे तिची काहीशी पिछेहाट झाली; पण तिने अखेर तिसऱ्या क्रमांकापेक्षा जास्त पिछेहाट होऊ दिली नाही.