पॅनकार्ड अद्ययावत करण्याचा फोन आला आणि १२ लाखाला गंडला

0
240

पुणे, दि. १८ (पीसीबी) : पॅनकार्ड अद्ययावत करण्याच्या बतावणीने सायबर चोरट्यांनी निवृत्त सनदी लेखापालाची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार पत्नीसह कोंढव्यातील उंड्री परिसरात राहायला आहेत. त्यांची दोन्ही मुले परदेशात नोकरीनिमित्त स्थायिक झाली आहेत. ज्येष्ठ नागरिक खासगी कंपनीत सनदी लेखापाल होते. २००५ मध्ये ते कंपनीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी काही रक्कम बँक खात्यात ठेवली होती. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. पॅनकार्ड अद्ययावत करण्याची बतावणी केली. पॅनकार्डमधील माहिती अद्ययावत न केल्यास बँकेतून पैसे काढता येणार नाही, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली.

चोरट्यांनी त्यांना एपीके नावाचे ॲप घेण्यास सांगितले. हे ॲप घेतल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ११ लाख ८८ हजार रुपयांची रक्कम चोरट्याने स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलिसांनी ‘पेयू’ कंपनीशी तातडीने संपर्क साधला. त्यापैकी एक लाख ९८ हजार रुपये ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नीच्या खात्यात परत वळविण्यात आले. उर्वरित ११ लाख ८८ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरली. त्यानंतर पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष साेनवणे तपास करत आहेत.