पूर्वीचे राज्यकर्ते नोकऱ्या देत होते,आताचे घालवतात

0
203

– कार्पोरेट खाजगीकरणाच्या काळात कामगार संघटना टिकवण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागणार आहेत-कॉम्रेड एस एन पाठक

खडकी, दि. ११ (पीसीबी) – ब्रिटिश काळात 1925 साली कामगार संघटना कायदा संमत झाला,मात्र संरक्षण उद्योगातील कामगारांना युनियन बनवण्याचे हक्क नव्हते. समाजवादी,डाव्या विचारांच्या त्यागी,समर्पित भावनेच्या नेत्यांनी गुप्तपणे खडकी येथे ऑल इंडिया डिफेन्स असोसिएशन संलग्न एम.टी.एस.एस.डी वर्कर्स युनियनची स्थापना 10 जानेवारी 1948 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केली.

साथी एस. एम. जोशी,बी. के. बोकील, के. अंडीअप्पन,प्रकाश गोडसे या समाजवादी नेत्यांनी 42 दारुगोळा कारखाने,ऑर्डनन्स डेपो, ई एम ई वर्कशॉप,स्टेशन वर्कशॉप,टाचणी ते रणगाडा उत्पादन सह विविध संरक्षण सामुग्री उत्पादन करणाऱ्या सरकारी कारखान्यातील कामगारांना एकत्र केले. खडकी,कानपुर,बंगाल येथील फेडरेशन ना एकत्र करून ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन(ए.आय.डी.ई.एफ) एका मोठ्या संघटनेची स्थापना केली.तो त्याग व समर्पित भावना आज 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षात अमर आहेत.मात्र आत्ता आपण अस्तित्व टिकवण्यासाठी लढत आहोत.असे अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाचे(AIDEF)राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड एस एन पाठक यांनी अमृतमहोत्सवी वर्धापन दिनाचे स्वागत करताना सांगितले.

खडकी येथे संघटनेच्या मुख्यालयापासून एम.टी.एस.एस.एस.डी वर्कर्स युनियनच्या सभागृहापर्यंत कामगारांनी विजयी मिरवणूक काढली.

इतिहास विसरून चालणार नाही,खाजगीकरण,कंत्राटीकरण होत आहे.

कॉम्रेड एस एन पाठक यांनी कामगार चळवळ,जागतिकीकरण याचा उल्लेख करून सांगितले की,
1991 साली खाजगीकरणाचे धोरण सुरू झाले आहे.पूर्वीचे राज्यकर्ते नोकऱ्या देत होते,आताचे घालवत आहेत.राजकीय पक्ष खाजगी कार्पोरेट भांडवलदारांनी ताब्यात घेतले आहेत.मोठ्या सरकारी कंपन्यांची विक्री करण्यात आली आहे.मोदी सरकारने संरक्षण उद्योगात उद्योगपतींना मुक्त सवलती दिल्या आहेत.12 लाख कंत्राटी कामगार काम करत आहेत.

आर्थिक गुलामगिरीत श्रमिक भरडला जात आहेत.नवीन कायमस्वरूपी नोकरभरती,सेवा सवलती बंद आहेत.जगाला समृद्धी सुख शांती देणारा विश्वबंधुत्व असलेला आपला हिंदू धर्म कधीच धोक्यात त्या दुष्ट काळात आला नाही.आपला धर्म धोक्यात नाही.

आपण सैन्यासाठी बंदुका बनवत होतो.आता मेक इन इंडियाच्या नावाखाली रशियन एके 47 चे सुटे भाग इथे जोडत आहोत.संरक्षण उद्योगाच्या अब्जावधी रुपये किमतीच्या जमिनी कवडी मोलाने कार्पोरेटच्या ताब्यात जात आहेत.उद्योगपतींच्या आत्मनिर्भरतेसाठी खाजगीकरण केले जात आहे.इतिहास विसरून चालणार नाही.पूर्वीचे राजे ब्रिटिशांचे मांडलिक होते,आपण गुलामगिरीत गेलो.आताचे राजे कार्पोरेट देशी विदेशी कंपन्यांचे मांडलिक आहेत आपण गुलामगिरीत जात आहोत.त्यामुळे कोणी इतिहास विसरू नका,अस्तित्वाचा प्रश्न आहे.कार्पोरेट खाजगीकरणाच्या काळात कामगार संघटना टिकवण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागणार आहेत,असे सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी MTSSD वर्कस युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड सलीम सय्यद होते.मोहन होळ,रविंद्र रेड्डी,विशाल डुंबरे,राजू घुले,फिरोज सय्यद,सतीश सात्रस आदी पदाधिकारी उपस्थित होते.किरण ननावरे यांनी सूत्रसंचालन केले.सरफराज सौदागर यांनी प्रास्ताविक केले.आदित्य वावळे यांनी आभार प्रदर्शन केले.