पूर्ववैमनस्यातून दोघांना बेदम मारहाण; गॅसची टाकी डोक्यात मारून खुनाचा प्रयत्न

0
83

महाळुंगे, दि. ०१ (पीसीबी) : जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांनी मिळून दोन तरुणांना बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्यात गॅसच्या टाक्या मारून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 29) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास महाळुंगे बाजारात घडली.

रोहन रामचंद्र जावळे (वय 22, रा. महाळुंगे, ता. खेड), वैभव वरघट (वय 25) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी रोहन जावळे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरुण राठोड (वय 24), मुनीर शेख (वय 25), मुबरेश बाबमिया शेख (वय 19, तिघे रा. महाळुंगे) आणि तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन आणि त्यांचा मित्र वैभव हे दोघेजण फिर्यादी यांच्या गॅस रिपेरिंग दुकानात बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी अरुण आणि मुनीर या दोघांनी लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्याने, गॅसच्या टाकीने फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला मारहाण केली. मुनीर याने वैभव याच्या डोक्यात गॅसची टाकी मारून गंभीर जखमी करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपींनी लोखंडी पाईप, लाकडी दांडके लोकांच्या दिशेने भिरकावून समोर आले तर मारून टाकेल, अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. पोलिसांनी मुनीर आणि मुबरेश या दोघांना अटक केली आहे. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत