पूर्ववैमनस्‍यातून तरुणावर खुनी हल्‍ला

0
66

निगडी, दि. 26 (पीसीबी) : पूर्वी झालेल्‍या भांडणाच्‍या कारणावरून तीन जणांनी मिळून एका तरुणावर ब्‍लेडने वार करीत तसेच दगडाने मारत खुनी हल्‍ला केला. ही घटना रविवारी (दि. २४) रात्री सव्‍वा दहा वाजताच्‍या सुमारास ओटास्‍कीम, निगडी येथे घडली.

प्रमोद ससाणे (रा. राहुलनगर, निगडी), आदित्‍य भोसले (रा. ओटास्‍कीम, निगडी) आणिएजान मेमन (पूर्ण नाव, पत्‍ता माहिती नाही) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. अभय राघू उभे (वय १९, रा. पवळे हायस्‍कूल जवळ, राहूलनगर, निगडी) असे जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव असून त्‍याने सोमवारी (दि. २५) याबाबत निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रविवारी रात्री सव्‍वादहा वाजताच्‍या सुमारास फिर्यादी अभय हे आपल्‍या आईला कामावरून घरी घेऊन येण्‍यासाठी दुचाकीवरून चालले होते. त्‍यावेळी आरोपींनी फिर्यादी अभय यांचा रस्‍ता अडविला. पूर्वी झालेल्‍या भांडणाच्‍या कारणावरून आरोपी आदित्‍य याने डोक्‍यात दगडाने मारहाण केली. त्‍यानंतर आरोपी प्रमोद याने तुला आज जिवंत सोडत नाही. आज तुझा मर्डर करतो, असे म्‍हणत त्‍याच्‍या जवळील ब्लेडने फिर्यादी अभय याच्‍या मानेवार, गळ्यावर नाकावर, ओठावर, भुवईच्‍या वर ब्‍लेडने वार करीत जखमी केले. तसेच आरोपी एजाज याने लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. फिर्यादी अभय यांचे वडिल भांडण सोडविण्‍यासाठी आले असता आरोपी प्रमोद याने त्‍यांच्‍या हातावर ब्लेडने मारून त्‍यांनाही जखमी केले. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.