वाकड, दि. २२ (पीसीबी) – तडीपार गुंडाला मारहाण करून चाकूने भोकसत त्याच्यावर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री पवारनगर, ताथवडे येथे घडली. रविराज उर्फ कन्नडया राजेंद्र केदार (वय 24, रा. अशोकनगर, ताथवडे) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी रविराज याच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश नितीन शेळके (वय 24), आदित्य रमेश चांदणे (वय 23), धनंजय महेश दाखले (वय 24), अनिकेत शिंदे उर्फ मोन्या (वय 20) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी रविराज हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तडीपारीचा कालावधी सुरु असताना तो शहराच्या हद्दीत आला. शनिवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास तो पवारनगर ताथवडे येथे असताना आरोपी गणेश शेळके याने रविराज याला बोलावून घेतले. त्यानंतर रविराजला बोलण्यात गुंतवून जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी चाकू, कोयत्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी रविराजच्या पोटात चाकूने भोकसले. जखमी अवस्थेत आरोपींच्या तावडीतून सुटून रविराज घरी जात असताना तो चिखलात पाय घसरून पडला. त्यानंतर आरोपींनी रविराजवर पुन्हा चाकू आणि कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. रविवारी पोलिसांनी गणेश शेळके याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.