पूर्ववैमनस्यातून घरात घुसून लुटमार करत वाहनांची तोडफोड

0
868

पिंपरी, दि. ८ (पीसीबी)- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेच्या घरात घुसून पाच जणांनी मिळून लुटमार केली. तसेच बाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि. 7) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास पिंपरीतील गांधीनगर परिसरात घडली. याप्रकरणी एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष अशोक अलकुंटे (वय 19), कृष्णा तिमप्पा निराळे (वय 22), अल्पवयीन मुलगा, रोहित आणि अज्या गवांडे (सर्व रा. गांधनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकाचे नातेवाईक आहेत. त्यांचे पूर्वी भांडण झाले होते. याबाबत आरोपींच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तकार केली होती. याचा राग मनात धरून आरोपी सोमवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्या मुलीचा मोबाइल फोन फोडून नुकसान केले. टेबलवर ठेवलेली पर्स व त्यामधील एक हजार 300 रुपयांचा ऐवज कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने चोरून नेला. जाताना आरोपींनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजावर कोयत्याने मारून नुकसान केले. जाताना आरोपींनी रोडवरील वाहनांवर कोयत्याने मारून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी संतोष आणि कृष्णा यांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.