दि. 18 (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने एका व्यक्तीला मारहाण करत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने वार केले. यामध्ये व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (१७ जानेवारी) रात्री चिकन चौक, निगडी येथे घडली.
भरत भागवत म्हस्के (३४, निगडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हृतिक सकट, सचिन जाधव, धनंजय उर्फ बबलू सूर्यकांत रणदिवे, सुरज कोंडीराम ओव्हाळ, गणेश उबाळे, विशाल उर्फ दुग्गु शंकर वैरागे आणि इतर साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत हे त्यांच्या मित्रांसोबत चिकन चौकात गप्पा मारत थांबले होते. भरत यांचे हृतिक याच्यासोबत भांडण झाले होते. त्या कारणावरून हृतिक याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून भरत यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. लाकडी दांडके आणि हाताने मारून भरत यांना गंभीर जखमी केले. पोलिसांनी धनंजय रणदिवे, सुरज ओव्हाळ आणि विशाल वैरागे यांना अटक केली आहे.