सुनीता पवार सानेगुरुजी शिक्षकप्रतिभा पुरस्काराने सन्मानित
पिंपरी, दि. 23 (पीसीबी) “आपल्या कामाची दखल घेऊन प्रदान करण्यात आलेले पुरस्कार प्रेरणा देण्याचे काम करतात; मात्र त्यामुळे वाढलेल्या जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे बुधवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी – चिंचवड विभागाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, डॉ. पी. एस. आगरवाल, सेवानिवृत्त शिक्षिका शोभा जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या भूमकर चौकातील पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत असलेल्या उपक्रमशील शिक्षिका सुनीता पवार यांना सानेगुरुजी शिक्षकप्रतिभा पुरस्काराने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, तुकारामांची गाथा असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी पुरुषोत्तम सदाफुले यांनी, “समाजात असंख्य शिक्षक कार्यरत आहेत; परंतु आपले कर्तव्य बजावत असताना समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा उचित सन्मान करण्यासाठी प्रतिष्ठान कटिबद्ध आहे!” अशी भूमिका मांडली. बाजीराव सातपुते यांनी प्रास्ताविकातून, “सानेगुरुजी पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी सुनीता पवार या विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी दिल्ली येथे गेल्या असल्याने त्या सोहळ्याचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते त्यांना आता सन्मानित करण्यात येत आहे!” अशी माहिती दिली. श्रीकांत चौगुले यांनी सुनीता पवार यांच्या कार्याचा सविस्तर परिचय करून दिला.
पुरस्काराला उत्तर देताना सुनीता पवार यांनी आपल्या मनोगतातून, “हा पुरस्कार म्हणजे ईश्वरीय इच्छा आहे!” अशी कृतज्ञता व्यक्त केली. कैलास भैरट, सुभाष चव्हाण, अशोकमहाराज गोरे, मुरलीधर दळवी, मानसी चिटणीस यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कंक यांनी आभार मानले.