पुरंदचे माजी आमदार संजय जगताप भाजपमध्ये

0
4

पुणे, दि. १६ ( पीसीबी ) : काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडला. पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप भाजपच्या वाटेवर असल्याची काही दिवसांपासून चर्चा होती. सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी संजय जगताप यांना भेटून भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज सासवडमध्ये भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संजय जगताप यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे, या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

पक्षप्रवेशानंतर बोलताना संजय जगताप म्हणाले, पक्षप्रवेशाला वेळ झाला आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहायला उशीर झाला त्यासाठी दिलगीरी व्यक्त करतो, उर्वरीत पक्षप्रवेश काही वेळाने पूर्ण होतील. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो असंही जगताप म्हणालेत. माझ्या स्वभावात दोष आहे मी कायम उशीरा पोहोचतो त्यासाठी यावेळी जगताप यांनी दिलगिरी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आणि भाजपची साथ आपल्याला लाभली आहे, असंही यावेळी कार्यक्रमात संजय जगताप यांनी म्हटलं आहे. तिथे विकास आहे, तिथे राजकारण नाही, इथे कोणत्याही शेतकऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन विकास होत नाही, इथे विकास होतो. या विचाराकडे येण्याचं माझं हेच कारण आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी आज पक्षप्रवेश केला आहे.

सामाजिक समरसतेचे विचार मला भावला
आज 3 हजार प्रवेश आपल्याला करायचे होते. पण, यादी कमी करून 378 प्रवेश आहेत. फक्त संजय जगताप प्रवेश करत नाहीत तर प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी प्रवेश करतो आहे. माझ्या स्वभावामध्ये दोष आहे मी कधीच वेळेवरती येत नाही. माझे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, विमानतळाचा मोठा प्रश्न आहे. विमानतळ हे पुरंदर तालुक्यातच होणार आणि योग्य ठिकाणी होणार असा मी तुम्हाला शब्द देतो. कुठलाही प्रकल्प शेतकऱ्यांच्या डोक्यावर पाय देऊन होत नाही. सर्वसामान्यांच्या खात्यात पैसे देण्याचे काम नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने केलं आहे. सामाजिक समरसतेचे विचार मला भावला त्यामुळे मी पक्षप्रवेश करत आहे. एखाद्याला पक्षात घेताना खूप अडचणी तयार होतात. तुम्ही मला सामावून घेतले असंही पुढे संजय जगताप यांनी म्हटलं आहे.

पंचायत समिती, जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका या ठिकाणी आपल्या कुठल्याही पैलवानाची पाठ मातीला लागणार नाही असा विश्वास देतो. येणाऱ्या काळात आम्ही भाजपाचा प्रचार आणि प्रसार करू. जी जबाबदारी द्याल, ती जबाबदारी तळमळीने शेवटपर्यंत पार पाडण्याचं काम करेन. परंतु येणाऱ्या काळामध्ये मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी पुरंदर हवेलीच्या जनतेला आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक परिवाराला सांगायचे कुठल्याही अन्यायाला त्या ठिकाणी ठोसपणे आणि ताकतीने त्या ठिकाणी आपण उभं राहण्याचे काम संजय जगताप प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या परिवाराच्या मागे राहील प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे राहील, विकासाच्या बाबतीत कोणालाही राजकारण करून देणार नाही. मागच्या दोन वर्षात साडीने आमच्या पुरंदरला गुंडाळून टाकले असं म्हणत नाव न घेता विजय शिवतारे यांना संजय जगतापांनी टोला लगावला आहे.