पुन्हा शाईफेकचा धोका ओळखून चंद्रकांत पाटील यांनी घेतली अशी खबरदारी

0
309

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना आज पुन्हा शाईफेकीची धमकी देण्यात आलीय. सांगवीत एका कार्यक्रमात शाईफेक करण्याची धमकी त्यांना देण्यात आली होती. या धमकीनंतर चंद्रकांत पाटील सतर्क झाले आहेत. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवडच्या सांगवी येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी खबरदारी म्हणून चेहऱ्यावर थेट प्लास्टिकचं मास्क लावल्याचं बघायला मिळालं. याशिवाय धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आलाय.

चंद्रकांत पाटील यांना फेसबुकच्या माध्यमातून शाईफेकीची धमकी देण्यात आली होती. पवना थडी कार्यक्रमात आल्यावर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याची धमकी देण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंचवड विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष विकास लोलें यांनी ही धमकी दिली होती.

“पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अॅगल घ्या, मू. पो. सांगवी, पवना थंडी यात्रा, आज पुन्हा शाईफेकीची उधळण होणार? मू. पो. सांगवी” अशा आशयाचे दोन पोस्ट विकास लोले यांनी फेसबुकवर केली होती. पण संबंधित पोस्ट नंतर डिलीट करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या विधानावरुन राज्यभरात त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. पाटील यांच्यावर वादग्रस्त विधानामुळे गेल्या आठवड्यात चिंचवडगाव येथे
शाईफेकही करण्यात आली होती. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. शाईफेक करणाऱ्या मनोज घरबाडे याच्यावर कारवाई करण्यात आली होती. पण त्या कारवाईवर टीका करण्यात आल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं होतं.
या दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी माफी मागत संबंधित प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण आज पुन्हा त्यांना या प्रकरणावरुन धमकी देण्यात आली.