पुन्हा बॉम्बसारखी वस्तू आढळल्याने खळबळ

0
469

पुणे, दि. २६ (पीसीबी) : बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची घटना पुन्हा एकदा पुण्यात घडली आहे. हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द याठिकाणी हा प्रकार घडला आहे. अण्णासाहेब मगर कॉलेजच्या उजव्या बाजूला ही वस्तू आढळली. अभिमान गायकवाड या सजग नागरिकाच्या नजरेस ही वस्तू पडली. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस पाटील यांना याविषयीची माहिती दिली. पोलीस पाटील अंकुश उंद्रे, अशोक आव्हाळे यांनी मग लोणीकंद पोलिसांशी संपर्क साधला. लोणीकंद पोलीस स्टेशनचे पीआय गजानन पवार यांना याविषयीची सविस्तर माहिती दिली. मांजरी खुर्द याठिकाणी पोलिसांचे पथक तसेच बॉम्ब शोधक पथक दाखल झाले. या तपासणीत त्याठिकाणी जुना ग्रेनेड आढळून आला आहे. सात-आठ वर्षांपूर्वी या ठिकाणी याठिकाणी भराव टाकण्यात आला होता. तोच आता वर आला आहे, असे प्रथमदर्शनी दिसत आहे.

पोलिसांनी याविषयी माहिती दिली. पुण्यातील हवेली तालुक्यात असलेल्या एका स्मशानभूमीच्या जवळ हे एक जुने ग्रेनेड आढळले. पोलीस त्याचप्रमाणे बॉम्बशोधक पथकाने तत्काळ याठिकाणी धाव घेऊन हे ग्रेनेड निकामी केले. मात्र या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हा जुना ग्रेनेट असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. काही वर्षांपूर्वी टाकलेला भराव आता वर आला. सध्या पावसाचे दिवस असल्याने तो वर आलेला दिसला. त्यानंतर तेथे बॉम्ब असल्याचा संशय वाटल्याने पोलिसांना खबर देण्यात आली होती.